ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र येणार?
पुणे (कटूसत्य वृत्त):- नोव्हेंबर शिवसेना भाजपची जुनी युती पुन्हा एकत्र यावी, अशी अपेक्षा पुण्यातील आजीमाजी आमदारांनी व्यक्त केली. निमित्त होतं ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी शिवसेना आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे.
चंद्रकांत मोकाटे यांनी तर भविष्यात राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते, असं सांगत जुनी शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असा नवा राजकीय बॉम्बच टाकून दिला. त्यावर भाजपच्या पर्वतीच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी अर्धी शिवसेना ऑलरेडी आमच्याकडे आलीय. उरलेल्या शिवसेनेनंही आमच्यासोबत यावं, असं सावध उत्तर दिलं.
एकूणच कायतर पुण्यातील शिवसेना-भाजपच्या माजी-आजी आमदारांनी दिवाळी फराळाच्या निमित्ताने जुन्या आठवणी जागवत पूर्वीसारखीच सेना - भाजपने पुन्हा एकत्र यावे, अशी अप्रत्यक्ष ईच्छाच प्रदर्शित केल्याचं बघायला मिळालं. पुण्याचे माजी पालकमंत्री आणि कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटीलही आवर्जून या दिवाळी फराळाला येऊन गेले. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जुन्याच युतीची राजकीय चर्चा रंगल्याचं बघायला मिळालं. दरम्यान माधुरी मिसाळ यांची मंत्रीपदाची संधी यावेळीही हुकल्याचं सांगत चंद्रकांत मोकाटे यांचे दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या पक्षात शिस्तीला महत्व असल्याचं सांगत माधुरी मिसाळ यांनी मोकाटे यांच्या हो - हो प्रतिसाद देणं खुबीनं टाळलं. पण अजित पवार गट सत्तेत सामिल झाल्याने आपली मंत्रीपदाची संधी हुकल्याची हलकिशी सल त्या लपवू शकल्या नाहीत. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते या आशेवरच विश्वास ठेऊन मोकाटे सारखे माजी आमदार पुन्हा नव्या जोमाने तयारी लागलेत हे फराळाच्यानिमित्ताने दिसून आलं.
0 Comments