कामती येथे दुय्यम निबंधक कार्यालय व्हावे : ॲड. जाधव
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन
कुरुल (कटूसत्य वृत्त):- सीना व भीमा नदीच्या मधोमध असलेल्या मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाची भौगोलिक परिस्थिती, या भागातील असलेले उद्योगधंदे आणि छोटे मोठे व्यवसाय आणि या भागातील जवळपास ५० गावातील असलेली लोकसंख्या पाहता कामती या मुख्य ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत जकराया शुगरचे चेअरमन ॲड. बिराप्पा जाधव यांनी व्यक्त केले असून यासाठी कामती परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे.
यावेळी भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आवताडे, भाजपा नेते जयसिंग आवताडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब डुबे-पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, राष्ट्रवादीचे माजी सभापती राहूल क्षिरसागर, कामती खुर्द चे माजी सरपंच संजय पाटील, विरवडे बु. चे उपसरपंच दिनकर पवार, सरपंच बाबासाहेब अंकुश, सिद्धेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
कामती, कुरुल, अंकोली व घोडेश्वर या मोठ्या बाजारपेठा असून लगतच जवळपास ५० गावे आहेत. यामुळे या ठिकाणी जवळपास ७० हजार लोकसंख्या असून या लोकांना खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी मोहोळ येथे तासनतास वेळ घालवावा लागतो. त्यामुळे इथल्या जनतेची सोय पाहता व येणे जाण्याचा खर्च आणि वेळेचा विचार करता कामती येथे दुय्यम निबंधक कार्यालय होणे गरजेचे असून यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.
- अंकुश आवताडे
भाजयुमो, जिल्हा उपाध्यक्ष
0 Comments