वर्षभरात अकरा जणांच्या आत्महत्या; महिलांचे दारू धंद्याविरोधात
उपोषण दारु बंद करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेला हत्तीज
येथील महिलावर्ग
वैराग (कटूसत्य वृत्त):- हत्तीज (ता. बार्शी) येथील महिलांनी गावातील दारू धंदे बंद होत नसल्यामुळे आक्रमक पवित्रा घेत उपोषणास सुरुवात केली आहे. वारंवार तक्रारी करून देखील गावात खुलेआम सुरू असल्याने या दारूच्या व्यसनापोटी वर्षभरात गावातील अकराजणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उपोषणकर्त्यानी दिली. जोपर्यंत अवैध दारू बंद होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका महिलांनी घेतली. हत्तीज, हिंगणी (आर), चिंचखोपन अशी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या हत्ती गावात सातवीपर्यंत शाळा आहे.अकरा ठिकाणी दारू बेकायदेशीरित्या विकली जात आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या दारू धंद्याचा परिणाम गावातील तरुण-तरुणींवर होत असून गावकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतमध्ये ठराव, पोलिस ठाण्यामध्ये तक्रारी, राज्य उत्पादन शुल्काकडे तक्रारी, सर्व काही केले तरी गावातील दारू विक्री काही थांबली नाही. याचा परिणाम इतका झाला की वयस्कर लोकांसोबत तरुणांना देखील दारूचे व्यसन लागले. यातून चक्क अकरा जणांनी आत्महत्या केल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी जोपर्यंत गावातील सर्व अवैध दारू विक्री दुकाने बंद होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

0 Comments