नोकरीचे खासगीकरण शैक्षणिक क्षेत्रासाठी धोक्याचे वळण !
- विठ्ठल कांगणे
वैराग (कटूसत्य वृत्त):- राज्य सरकारच्या माध्यमातून नोकर भरती मध्ये ठेकेदारी आणि मक्तेदारी पद्धत निर्माण करण्याचे धोरण आखले असून सरकारचे हे धोरण नोकरदारांसाठी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी येणाऱ्या तरुण पिढ्यांसाठी धोकादायक आणि हानिकारक असल्याचे मत प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणे यांनी वैराग येथे व्यक्त केले. जय जगदंबा शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी बाळासाहेब( बप्पा) कोरके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यान कार्यक्रमात कांगणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बार्शीच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील ,तर प्रमुख अतिथी म्हणून शाहू शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी धनंजय पाटील आवर्जून उपस्थित होते. यावेळी डॉ. कपिल कोरके यांनी जय जगदंबा शिक्षण संकुलाची उभारणी करण्यासाठी बप्पांनी प्रतिकूल परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करून हे शिक्षण संकुल उभा केलं याची थोडक्यात माहिती दिली. आणि आमच्या शाळेतील लाख ते दीड लाख पगार घेणाऱ्या शिक्षकांना ठेकेदार पद्धतीने काम करणे योग्य आहे का..? असा सवाल उपस्थित करून आमच्या संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या मुलांना याच संस्थेत नोकरीवर घेण्याचा शब्द आम्ही शिक्षकांना दिला आहे .त्यामुळे येणाऱ्या तरुण आणि भावी शिक्षकांचे सरकारच्या या निर्णयामुळे फार मोठे नुकसान होणार असल्याचं यावेळी डॉ. कोरके यांनी सांगितले.
शिक्षण महर्षी बाळासाहेब (बप्पा) कोरके यांच्या जयंतीनिमित्त वैराग भागामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आणि निबंध स्पर्धांचे आयोजन कासारी विद्यालयामध्ये करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी विनायक गरड, अरुण बारबोले, महेश सरवदे, सुजित कदम, संतोष गायकवाड, रवींद्र कापसे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, माजी सभापती अनिल डिसले, गोविंदराव पंखे, नवनाथ कापसे, नंदकुमार पांढरमिसे, काकासाहेब कोरके, आनंद कोरके, माजी जि प सदस्या सुरेखा कोरके, डॉ. अमिता कोरके, डॉ. शितल कोरके, आप्पासाहेब कानगुडे , सुरेश गुंड, प्रताप पाटील ,सुनील शेळके, बाळासाहेब शिंदे, अँड .रणजीत गुंड राजेंद्र कोंढारे, मीनाक्षी कदम मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments