टोमॅटो ४० पैसे प्रतिकिलो ; संतप्त शेतकऱ्याचा शेतमाल रस्त्यावर फेकून रास्ता-रोको
मोडनिंब (कटूसत्य वृत्त):- टोमॅटोच्या कोसळलेल्या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पुणे- सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून आंदोलन केले. शेटफळ येथे माढा रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.-या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा दर मिळत आहे. उत्पादनावर होणारा खर्चही भागत नाही. अशातच शेटफळ येथील हनुमंत जाधव या शेतकऱ्याचा जवळपास पाच टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी ४० पैसे प्रतिकिलो दराने मागितले. टोमॅटो तोडणी, वाहतूक व हमालीचा खर्च जवळपास प्रतिकिलो दीड रुपया होतो.
शिवाय लागवडीपासून आजपर्यंत झालेला लाखो रुपयांचा खर्च वेगळाच. अशातच २५ किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला दहा रुपये दराने व्यापाऱ्यांनी मागितल्यामुळे संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने सर्व टोमॅटो महामार्गावर फेकून दिले. संतप्त शेतकऱ्याच्या या आंदोलनास अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा व्यक्त करत टोमॅटो दराबाबत रोष व्यक्त केला. लाखो रुपये खर्च करून, रात्रंदिवस राबूनही श्रमाची किंमत होत नसल्याची उद्विग्नता या तरुण शेतकऱ्याच्या या अचानक झालेल्या आंदोलनात दिसून आली.

0 Comments