भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारताचे महान कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे काल दि. 28 सप्टेंबर 2023 तामिळनाडूतील चेन्नई येथे निधन झाले. लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जीवन प्रवास व त्यांचे हरितक्रांती मधील योगदान या विषयावर सर्व विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफित दाखविण्यात आली. भारतासारख्या विकसनशील देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यामध्ये डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या गहू व तांदूळ या पिकांमधील सुधारित वाण विकसित केले. या संकरित व सुधारित वाणांच्या माध्यमातून त्यांनी देशातील पहिली हरितक्रांती घडवून आणली. १९६० ते १९७० च्या दशकात दुष्काळामध्ये होरपळत असलेल्या भारतीय जनतेस नवीन जीवनदान दिले. या हरितक्रांतीने भारताला अन्नटंचाईचा असलेला कलंक पुसून काढला. संकरित वाणांची निर्मिती करून ते थांबले नाहीत तर ते वाण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत त्यांनी पोहोचविले. त्यांच्या निधनाने भारतीय कृषी क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे मत अध्यक्ष कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य प्रा. नवनाथ गोसावी इतर प्राध्यापक वर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments