Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी – डॉ. संजय ढोले

 विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी – डॉ. संजय ढोले


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-संशोधनाच्या माध्यमातून नवी पिढी तयार व्हावी, जीवन जगण्यासाठीची मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा. नवीन ज्ञानामार्फत नवनिर्मिती करता यावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे. प्रत्येक घटकांमधील साधर्म्य आणि वैधर्म्य शोधता यायला हवे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधकीय वृत्ती वाढीस लागावी असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडकी यांच्या वतीने आयोजित केलेल्या विभागीय अविष्कार स्पर्धेच्या उद्घान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे,  स्पर्धेचे परीक्षक डॉ. हरीश नवले, डॉ. वैभव जाधव, डॉ.सय्यद वकील, डॉ. राजेंद्र लेले,  डॉ. सुचेता दळवी, स्पर्धेचे समन्वयक डॉ. तेजस्विनी शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले की, विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक आहे.  अविष्कार स्पर्धा ही जगण्यासाठीची व्यावहारिक संधी निर्माण करून देते. माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान याचबरोबर मानव वंशशास्त्र, मानव जाती आणि मानवता यामध्येही संशोधनात्मक कार्य व्हायला हवे म्हणून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्व समावेशक समस्या आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यामध्ये केले जाणारे निराकरण हेही महत्त्वाचे असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पडायला हवेत. ते विचारायला हवेत. त्यातून नवनिर्मितीचा विचार गवसतो.

सदर स्पर्धेत मानव्य विद्या, वाणिज्य आणि अभियात्रिकी विभागातून ४० महाविद्यालयातील १३७ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल आणि सचिव आनंद छाजेड यांचे मार्गदर्शन लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments