Hot Posts

6/recent/ticker-posts

माथाडी बोर्ड जिवंत राहिले पाहिजे -घायाळ विविध मागण्यांसाठी माथाडी बोर्डावर हमाल-मापाडी कामगारांचा विराट मोर्चा

 माथाडी बोर्ड जिवंत राहिले पाहिजे -घायाळ

विविध मागण्यांसाठी माथाडी बोर्डावर हमाल-मापाडी कामगारांचा विराट मोर्चा

पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी आपले उभे आयुष्य हमाल-मापाडी कामगारांसाठी वेचले असून आज राज्यातील 36 महामंडळे स्थापन करण्यात डॉ. बाबा आढाव यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रात सामाजिक सुरक्षितता कायदा डॉ. बाबा आढाव यांनी केंद्रात सहमत करून घेतला. परंतू सामाजिक सुरक्षितता कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी माथाडी बोर्ड जिवंत राहिले पाहिजे, असे आव्हान महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी केले. सोलापूर जिल्हा हमाल-मापाडी, माथाडी, श्रमजिवी कामगार समन्वय समितीच्यावतीने गुरुवार दि. 5 रोजी जिल्ह्यातील हमाल मापाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वखाली जिल्हा माथाडी बोर्ड कार्यालयावर हालगी  मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाशी संलग्न असणार्‍या जिल्ह्यातील सर्व हमाल मापाडी कामगारांचे अनेक प्रश्‍न निर्माण झाले असून ते प्रश्‍न जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी बोर्ड सोलापूरचे चेअरमन एस.एम. गायकवाड यांनी त्वरित सोडविण्यासाठी या जिल्हा मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये खालील मागण्यांचे निवेदन चेअरमन एस.एम. गायकवाड यांना देण्यात आले. जिल्ह्यात माथाडी हमाल कायद्याची अंमलबजावणीतील अनागोंदी व मनमानी कारभार तात्काळ थांबवून कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार या कायद्यातील शब्द प्रयोगाकडे आवर्जून लक्ष वेधावे. या कायद्याची जिल्ह्यात सार्वत्रिक अंमलबजावणी झाली पाहिजे. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये शासनाने जिल्हा माथाडी मंडळाकडे अधिकारी कर्मचारी यांच्या रिक्त जागी नवीन नेमणूक केलेल्या नाहीत. सबब माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणारी सक्षम यंत्रणा कोलमडली असल्याने हमाल तोलाईदार माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही. कायद्याची अंमलबजावणी होत नाही. जिल्हा माथाडी मंडळामध्ये चार निरीक्षकांचे नेमणूक करण्यात यावी. जिल्हा माथाडी मंडळातील रिक्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या जागी नवीन नेमणूक, भरती त्वरित करणेबाबत शासनाकडे मागणी करावी. जिल्हा माथाडी मंडळाकडे निरीक्षक व कर्मचारी यांची नव्याने भरती करताना जिल्हा माथाडी मंडळाकडील नोंदणीकृत हमाल-तोलाईदार महिला माथाडी कामगारांच्या मुला-मुलींची प्राधान्याने भरती करणे सक्तीचे करावे व त्यांची भरती करावी. जिल्हा माथाडी मंडळ सक्षम होण्यासाठी स्थानिक माथाडी मंडळावर शासन नियुक्त हमाल व मालक प्रतिनिधी सदस्य यांच्या त्वरित नियुक्त्या कराव्यात. जिल्हा माथाडी मंडळावर कामगार, हमाल प्रतिनिधींची नियुक्ती करताना खर्‍या हमाल संघटना प्रतिनिधी व खर्‍या कार्यरत हमालांच्या नियुक्त्या कराव्यात. जिल्ह्यातील हमाल मापाडी, तोलाईदारांचे पगार वेळेवर करण्यात यावेत. वेळेवर पगार न भरणार्‍या मालक, व्यापारी, आडती यांच्यावर कायद्यानुसार खटले दाखल करण्याचे आदेश निरीक्षकांना द्यावेत. वैद्यकीय उपचार जिल्हा माथाडी मंडळाकडून मिळणेसाठी सध्याच्या लेव्ही दरामध्ये किमान दरात वाढ करून लेव्हीचे दर 35 टक्के करावेत. हमाल-तोलाईदार-महिला माथाडी कामगारांना म्हातारपणातील जीवन सुखकर होण्यासाठी किमान 3 हजार रूपये मासिक पेन्शन तात्काळ सुरू करण्याची माथाडी बोर्डाकडून शासनाने मागणी करावी. जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली शासकीय धान्य गोदामामधील हमालांना कायद्यानुसार सक्तीची व हक्काची साप्ताहिक सुट्टी मिळावी. माथाडी बोर्डाकडे नवीन नोंदणी कामगारांसाठी नोंदणी करण्यासाठी पंढरपूर येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील अर्ज माथाडी मंडळाकडे दाखल केले असून सुद्धा अजूनपर्यंत त्यांची नोंदणी केली नाही. तरी ते त्वरित करून घेण्यात यावी. पंढरपूर येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील परोपरांगत काम करीत असणार्‍या कामगारावर होणारा अन्याय कदापीही सहन करून घेतला जाणार नाही. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पंढरपूर येथील हमालांचे कामकाजाबाबत 2019 मध्ये तात्कालिन माथाडी मंडळाचे अध्यक्ष यांचे समोर बैठका होवुन सविस्तर चर्चा होवुन दि. 1/2/2019 रोजी अंतिम चर्चा होवून हमाली कामाचे नियोजन झाले व मा. अध्यक्षांनी दि. 6/2/2019 रोजी हमाली कामाचे वाटप नियोजन केले आहे तसे जा.क्र. सकाआ/माथाडी मंडळ / 701 चा आदेश हि पारित केले आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी संघटनेचे ऐकुन त्यांच्या दबावाखाली वखार महामंडळातील हमाली कामकाज वाटपाची सुनावणी आपण सुरु केली आहे. वास्तविक याबाबत आपल्याच माथाडी मंडळाने दि. 6/2/2019 रोजी निर्णय झालेला असताना पुन्हा सुनावणी घेणे चुकीचे आहे. तरी याबाबत कोणताही फेरनिर्णय घेण्यात नये. अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन छेडावे लागेल. जिल्ह्यातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी माथाडी बोर्डातील कर्मचार्‍यानी वेळोवेळी भेट देऊन पगार न भरणार्‍या कामगारांना व व्यापारी, आडती यांच्यावर नियंत्रणठेवणे गरजेचे आहे. व सर्वांचे पगार माथाडी बोर्डाकडूनच झाले पाहिजेत. माथाडी बोर्डातून पुर्वीप्रमाणे तीन महिन्यातून सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीची चेअरमन बरोबर बैठक व्हावी. त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यास मदत होईल. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व अडत व्यापार्‍यांच्या - माथाडीत नोंदी करून घेणे. बाजार समितीमध्ये अडत व्यापार्‍यांकडे बिगर नोंदीत कामगार काम करतात. हे कामगार माथाडी बोर्डात नोंदीत नसल्यामुळे या कामगारांचा माथाडीत भरणा होत नाही. कामगारांची लेव्ही बुडवून रोखीने पगार दिली जाते. त्यामुळे सर्वे करून बिगर नोंदित कामगारांची माथाडीत नोंद करावी. बाजार समितीमध्ये माथाडी बोर्डाच्या कर्मचार्‍यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, जेणे करून कामगारांना भरण्यासंदर्भात जनजागृती होईल व कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, सरचिटणीस सुभाष लोमटे, जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष सिताफळे, सचिव संतोष सावंत, सुरेश बागल, उपाध्यक्ष अ‍ॅड. राहूल सावंत, गोरख जगताप, खजिनदार सुखदेव चव्हाण, सहखजिनदार सिद्ध हिप्परगी, सह. सचिव दत्ता मुरूमकर, संघटक चांदा गफार, मार्केट कमिटी सोलापूरचे संचालक शिवानंद पुजारी यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील हमाल, तोलार कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments