Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबईतील आझाद मैदानावरील आमरण उपोषणाला माढ्यातून 9 विशेष शिक्षक जाणार

 मुंबईतील आझाद मैदानावरील आमरण उपोषणाला माढ्यातून 9 विशेष शिक्षक जाणार



माढा (कटूसत्य वृत्त):- समग्र शिक्षा समावेशित शिक्षणांतर्गत प्राथमिक स्तरावर राज्यभरात अनेक विशेष शिक्षक अल्प मानधनावर कंत्राटी पद्धतीने मागील सुमारे 12 ते 15 वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांना शासनाने अद्यापही सेवेत सामावून घेतले नाही त्यामुळे 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी न्याय मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातून मोठ्या संख्येने शिक्षक आमरण उपोषणाला येणार आहेत.या उपोषणासाठी माढा तालुक्यातून 9 जण जाणार असल्याची माहिती माढा गटसाधन केंद्राचे प्रमुख विशेष शिक्षक प्रवीण भांगे यांनी दिली आहे.

माढा तालुक्यात विविध 22 केंद्रातील शाळेत सुमारे 570 दिव्यांग विद्यार्थी असून त्यांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी,शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सर्वेक्षण करून शाळेत दाखल करण्यासाठी 7 विशेष शिक्षक व 2 विशेष तज्ञ शिक्षक मागील 15 वर्षापासून कार्यरत आहेत.त्यामध्ये विशेष तज्ञ शिक्षक अभिजीत कसबे,दिपाली माळी,प्रवीण भांगे,अजित काळे,अरुण गायकवाड, अभिजीत वाणी,वैशाली पडवळ, योगिता क्षीरसागर,कौशल्या माने या विशेष शिक्षकांचा समावेश असून हे सर्वजण बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.

या शिक्षकांनी वेळोवेळी शासनाकडे अर्ज व विनंती करुन सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार नवीन पदनिर्मिती करून शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे तसेच नियमित शिक्षकांप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने शासनाच्या सर्व सेवाशर्ती व नियम लागू करण्यात यावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता परंतु याची शासनाने कसलीही दखल न घेतल्यामुळे राज्यातील संघटनेच्या वतीने जोपर्यंत न्याय मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचेही विशेष शिक्षक प्रवीण भांगे यांनी सांगितले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments