राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर (कटुसत्य वृत्त): सोलापूर शहरात सरस्वती चौकातील ड्रीम पॅलेस बँक्वेट हॉल पोलीस कल्याण केंद्राजवळ येथे भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक ०२ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत चालणाऱ्या या प्रदर्शनात सकाळी ११ ते सायंकाळी ०९ वाजेपर्यंत सोलापूरकर सदरील प्रदर्शनाला भेट देऊ शकतात. प्रदर्शनात हातमागावरील उत्पादित अस्सल वस्त्रे जसे सिल्क टसर, करवती साडी व पैठणी सिल्क साडी, कोसा सिल्क साडी व कापड, घरगुती वापरण्याचे चादरी, टावेल, बेडशीट, नॅपकिन, पंचे लहान व मोठ्या सतरंज्या, विक्रीस ठेवलेले आहेत.सर्व प्रकारच्या कापड खरेदीवर २०% सवलत सहभागी संस्थाकडून देण्यात येत आहे. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २ सप्टेंबर रोजी या भागाचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलेले होते. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग आयुक्त वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन यांचे हातमाग कापड प्रसार प्रसिद्धी व विक्री विकास कार्यक्रमांतर्गत स्पेशल हॅण्डलूम एक्सपो सोलापूर या नावे हातमाग कापडाचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूरद्वारे हे आयोजन करण्यात आलेले आहे. उद्घाटनप्रसंगी महाटेक्स मुंबईचे माजी अध्यक्ष श्री गणपत कुरापाटी, महाटेक्स मुंबईचे माजी उपाध्यक्ष श्री लक्ष्मीनारायण गुल्लापल्ली तसेच वस्त्रोद्योग विभागाचे प्रतिनिधी म्हणून प्रादेशिक सह उपायुक्त श्री किसनराव पवार, माजी नगरसेवक श्री शिवानंद पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक हातमाग महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री विजय निमजे यांनी केले. हात मागावरच्या सहकारी संस्था बळकटीकरण करण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले व त्यांनी प्रदर्शनासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच विणकर कारागिरांच्या कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूरकरांनी द्यावे असे आवाहनही त्यांच्या मार्फत करण्यात आलेले होते. वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन व महाहँडलूम नागपूरच्यावतीने प्रचार प्रसिद्धी योजनेअंतर्गत वस्त्र नगरी अशी ख्याती असलेल्या सोलापूर शहरात प्रथमच हातमाग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनात राज्यातील हॅण्डलूम मार्क प्राप्त ४० हातमाग सहकारी संस्था व महाहॅन्डलूम नागपूर संस्थांनी सहभाग घेतलेला आहे. प्रवेश विनामूल्य असून पार्किंगची सुसज्ज सुविधा आहे. सुमारे १४ दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला सोलापूरकरांनी सकाळी ११ ते ९ या वेळेत अवश्य भेट द्यावे असे आवाहन प्रदर्शन प्रमुख श्री ज्ञानदेव बाभुळकर यांनी केलेला आहे.
0 Comments