Hot Posts

6/recent/ticker-posts

सिद्धेश्वर एक्सप्रेस व इतर रेल्वे गाड्यांना मोहोळमध्ये थांबा मिळावा

 सिद्धेश्वर एक्सप्रेस व इतर रेल्वे गाड्यांना मोहोळमध्ये थांबा मिळावा

▪️ मोहोळ भाजपाचे खा. जयसिद्धेश्वर यांच्याकडे साकडे


 कुरुल (कटूसत्य वृत्त):- गेल्या वर्षभरापासून सिध्देश्वर एक्सप्रेस, चेन्नई मेल, मिरज एक्सप्रेस त्याचसोबत नव्याने चालू झालेली वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वे मोहोळ येथे थांबा मिळावा म्हणून मागणी करत आहोत परंतू अजूनही सदरची मागणी भारत सरकार रेल्वे मंडल यांच्याकडून अद्याप पर्यंत मान्य झालेली नाही. मोहोळ तालुक्यातील प्रवाशांची संख्या मोठया प्रमाणात असून येथून बरेच प्रवासी कामाकरीता मुंबई, पुणे व इतर महानगरासाठी ये-जा करतात. या सर्व नागरिकांची मोहोळ येथे रेल्वेला थांबा नसल्यामुळे गैरसोय होत आहे. त्यामुळे मोहोळ येथे सर्व गाड्यांना थांबा मिळावा अशा मागणीचे निवेदन मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टी यांच्याकडून सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना देण्यात आले.

 या दिलेल्या निवेदनात पुढे लिहिले आहे की, कोरोनाच्या काळामध्ये पॅसेजरची ये-जा कमी झाल्यामुळे काही रेल्वे थांबत होत्या त्या देखील बंद झाल्या आहेत. स्थानिक रेल्वे प्रशासनाने चुकीची माहिती दिल्यामुळे थांबा चालू झालेला नाही. काही राजकीय विरोधक या प्रश्नाचा विपर्यास करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत यातच काही दिवसांपुर्वी एका विरोधकाने आपणांस मोबाईलवर फोन करुन त्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून नागरिकांमध्ये गैरसमज पसरवून राजकारण केले आहे. आम्ही केलेल्या मागणीनुसार आपणही गेले अनेक दिवसापांसून हा थांबा मिळावा म्हणून प्रयत्न करीत आहात याची आम्हांला पुर्णपणे जाणीव आहे आणि येणाऱ्या काळांमध्ये आपण मोहोळ विधानसभेचा हा असलेला प्रश्न मार्गी लावाल याची देखील खात्री असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले असून यात आणखीन व्यक्तीशः लक्ष घालून मोहोळ रेल्वे स्टेशनला या सर्व रेल्वे गाडयांचा थांबा चालू करावा. जेणे करुन सदरचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागेल असा आशावाद या निवेदनाच्या माध्यमातून व भाजपाने खासदारांकडे केला आहे.

 यावेळी मोहोळ तालुका भाजपा अध्यक्ष सुनील चव्हाण, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश झाडे, ज्येष्ठ नेते माजी सभापती यशवंत नरोटे, मुजीब मुजावर, सागर लेंगरे, द्रोणा लेंगरे, विशाल पवार, विशाल डोंगरे आदी उपस्थित होते.

 खा. महास्वामी यांच्याकडून रेल्वे मंत्र्याना पत्र

- मोहोळ येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून मोहोळ भाजपा पदाधिकाऱ्यांच्या समक्ष खा. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी  यांनी केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे पाटील यांना पत्र पाठवून त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे रेल्वे थांब्याची मागणी केली. यावेळी ना.दानवे यांनी याबाबत रेल्वे मंडळ सोलापूर यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवून घेऊ आणि रेल्वे थांब्या संदर्भात सकारात्मक भूमिका असेल असे सांगितले.


Reactions

Post a Comment

0 Comments