पत्रकारांना विविध योजनांच्या लाभासाठी सर्वोतोपरी सहकार्य : सोनटक्के
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार पदाधिकाऱ्यांचा सत्कार !
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील पत्रकारिता सजग आणि विकासात्मक अशीच आहे. पत्रकार सर्वांचे प्रश्न मांडतात मात्र स्वतःकडे दुर्लक्ष केले जाते. प्रतिकूल परिस्थितीतही काम करतात. यामुळे पत्रकारांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी दिले.
राज्य शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार राजा माने, राज्य अधिस्विकृती समितीवरील निवडीबद्दल प्रमोद बोडके आणि नूतन जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे नुतन समन्वयक भगवान परळीकर यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, माजी अध्यक्ष प्रशांत जोशी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्नांची गरज : माने
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने म्हणाले, पत्रकारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न गरजेचे आहेत. सोलापुरात पत्रकारांच्या गृह प्रकल्पाचे काम मार्गी लागले ही समाधानाची बाब आहे. पत्रकार संघटनांनी आपला दृष्टिकोन व कार्यपद्धती बदलण्याचा हा काळ आहे. केंद्र शासनाच्या नंतर राज्यात पहिल्यांदाच महाराष्ट्रात डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ मीडियातील पत्रकारांना श्रमिक पत्रकारांच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
प्रशांत जोशी म्हणाले, पत्रकारांना प्रतिकूल परिस्थिती वर मात करून काम करावे लागते. अनुकूल परिस्थिती त्यांच्या वाट्याला बहुदा येत नाही. यामुळे शहरी व ग्रामीण पत्रकारांना आरोग्य सुविधांसह विविध योजनांचा लाभ मिळावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी सत्कारमूर्ती भगवान परळीकर, प्रमोद बोडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी तर सूत्रसंचालन सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले. संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी आभार मानले.
0 Comments