उपळाई खुर्दच्या पालकर कुटुंबीयांनी पारंपरिक रुढी,प्रथा व परंपरेला दिला फाटा
तिसऱ्या दिवशी अस्थींचे विसर्जन शेतातच करून केले वृक्षारोपण
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील प्रगतशील शेतकरी हनुमंत ज्ञानदेव पालकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते.तिसऱ्या दिवशी त्यांच्या अस्थींचे विसर्जन जलाशयात किंवा नदी पात्रात न करता पालकर कुटुंबीयांनी पारंपरिक रुढी,परंपरा व प्रथेला फाटा देऊन स्वतःच्या शेतात करून त्या ठिकाणी वडिलांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी फळझाडांचे वृक्षारोपण करून एक वेगळा सामाजिक आदर्श प्रस्थापित केला आहे.
सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन टीमचे सक्रीय सदस्य रावसाहेब पालकर यांनी वडीलांच्या निधनाने खचून न जाता, दुःखाला कवटाळून न बसता वृक्षारोपणाचा धाडसी निर्णय घेतला.जलप्रदूषण टाळण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी आणि अंधश्रद्धेला मूठमाती देण्यासाठी त्यांनी कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांची मनधरणी करुन हा विधायक उपक्रम राबविला आहे. त्यांनी राबवलेला हा विधायक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद व अनुकरणीय आहे.यावेळी कुटुंबातील सदस्य,पाणी फाउंडेशनच्या टीमचे सदस्य,ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment