Hot Posts

6/recent/ticker-posts

पोखरापूर येथे जगदंबा मंदिराजवळ "त्या" गुहेत सापडला मानवी सांगाडा, पुरातत्व विभागाचे उत्खनन सुरूच

पोखरापूर येथे जगदंबा मंदिराजवळ "त्या" गुहेत सापडला मानवी सांगाडा, पुरातत्व विभागाचे उत्खनन सुरूच

पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय महामार्गाच्या संपादितक्षेत्रात प्राचीन जगदंबा देवीचे मंदिर पुनरोपन करण्याचे काम शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे. मंदिर परिसरात त्या गुहेत उत्खनन करत असताना एका समाधीच्या खाली दगडी बांधकामाच्या खोलीत प्राचीन मानवी सांगाडा आढळून आला आहे, त्यामुळे सदरचा मानवी सांगाडा हा प्राचीन स्वामीची संजीवन समाधी आहे का याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
आज आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली प्राचीन मंदिराच्या परिसरातील गुहेचे उत्खनन करत असताना दगडी बांधकामाच्या खोलीमध्ये एक मानवी शरीराचा सांगाडा आढळला असून तो किती वर्षांपूर्वीचा व कोणत्या स्वामी महाराजांचा असेल याबाबत पुरातत्त्व विभागाच्या वतीने संशोधन सुरू आहे आज दिवसभर प्राचीन मंदिर परिसरात गुहेमध्ये उत्खनन करत असताना ग्रामस्थांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती उत्खननांचे काम संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते काम अपूर्ण राहिल्याने उद्या त्या ठिकाणी उर्वरित उत्खनन करण्यात येणार आहे. आज दिवसभर मोठी गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त मध्ये वाढ करण्यात आली होती .महामार्गाच्या संपादित क्षेत्रात देवीचे मंदिर आल्याने पुरातत्व विभागाच्या वतीने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली जगदंबेचे मंदिर पाडून मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे. प्राचीन जगदंबा मंदिर हे बाराव्या शतकातील असल्याने ते जतन झाले पाहिजे अशी ठाम भूमिका शासनाच्या पुरातत्त्व विभागाने सुरुवातीला घेतली होती. तसे लेखी पत्र पुरातत्व विभागाच्या संचालकाने जिल्हाधिकारी सोलापूर व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व देवस्थान ट्रस्टीना लेखी स्वरुपात यापूर्वीच कळविलेले होते , परंतु त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कारवाई करत नव्हते म्हणून हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते त्या ठिकाणी मात्र पुरातत विभागाच्या वतीने मंदिर मूळ स्वरूपात जतन करण्याऐवजी मंदिर पुनर्रोपन करण्याची भूमिका मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्यासमोर लेखी स्वरुपात मांडून मूळ भूमिका बदलल्याने पुरातत्त्व विभागाने मंदिर जतन करण्याची भूमिका बदलून मंदिर पुनर्रोपन करण्याची भूमिका कोर्टासमोर घेतल्याने हे प्राचीन जगदंबा देवीचे मंदिर मूळ ठिकाणाहून रातोरात पाडून सुरक्षित जागी पुरातत्त्व विभागाच्या वतीने स्थलांतरित करण्यात आलेले आहे. हिंदुत्ववादी सरकारने हिंदूचे प्राचीन मंदिर पाडल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत रस्ता रोको आंदोलन केले होते. जगदंबा देवीचे मंदिर पाडल्यानंतर परिसरात असलेली समाधी स्थळे ,दीपमाळ आदी प्राचीन अवशेष पाडण्यात आले.
समाधी स्थळे उत्खनन करत असताना त्या ठिकाणी एका समाधीचे पाडकाम केल्यानंतर त्या समाधीखाली एक गुहा आढळून आली.
आज दिवसभर "त्या" समाधी खाली उत्खनन चालू होते. उत्खननादरम्यान सापडलेला मातीचा डेरा व मानवी सांगाडा आढळून आला आहे. 
  कथीत संजीवन समाधी बाबत आजतागायत ग्रामस्थ अनभिज्ञ होते. या अनभिज्ञतेचे गुपित हे मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात दडलेले आहे. त्यामुळे प्राचीन जगदंबा मंदिराच्या संपूर्ण परिसरात शास्त्रीय पद्धतीने उत्खनन व संशोधन करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने जोर धरत आहे. सदर ठिकाणी मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी भेट दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments