थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने 11 हजार शिवप्रेमींसाठी शिवभोजन !
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने मिरवणूक व अन्य गोष्टीं टाळून शिवजन्मोत्सवानिमित्त 11 हजार शिवप्रेमीसाठी शिवभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे , अशी माहिती प्रमुख विश्वस्त तथा माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील शिवप्रेमी व भगिनी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. यादरम्यान हॉटेल बंद असतात किंवा जेवणा संदर्भात अडचण होते. ही मिरवणूक पाहून शिवप्रेमी उपाशी गावाकडे जाऊ नयेत. या उद्देशातून शिवजयंती निमित्त मिरवणूक व इतर गोष्टींना टाळून पोटभर जेवण देऊन शिवप्रेमींना तृप्त करून छत्रपतींच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्याचे काम थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.
यापूर्वी 7 हजार शिवप्रेमींना व बंदोबस्तातील पोलीस, ज्येष्ठ नागरिक यांना भोजन देण्यात आले होते. ही परंपरा चालू ठेवत यंदाही दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत 11 हजार शिवप्रेमी व बंदोबस्तातील पोलीस बांधवांसाठी या शिवभोजनाचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजीराव महाराज मठा शेजारी टेबल खुर्चीवर या भोजनाची व्यवस्था केली आहे. महिला व लहान मुलांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व शिवभक्तांनी या शिव भोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख विश्वस्त अमोल शिंदे यांनी यावेळी केले आहे.
या पत्रकार परिषदेत सागर पिसे, कल्याणसिंह चव्हाण, अमर पवार, वैभव विभुते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments