हिवाळी अधिवेशनात फक्त आरोप प्रत्यारोपांची उडाली राळ...! शेतकऱ्यांचे प्रश्न गहाळ...!!
सोलापूर (दादासाहेब निळ):- त्यातील शेतकरी आणि उपेक्षित नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठीच दरवर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन मोठ्या जोमाने भरवली जाते.
प्रति वर्षाप्रमाणे यंदाही नव्या सरकारने मोठ्या जोमाने हिवाळी अधिवेशन भरविले परंतु गेल्या आठ दिवसांमध्ये एकही प्रश्न या हिवाळी अधिवेशनात कोणत्याही लोकप्रतिनिधीने व्यवस्थित मांडला नसून या अधिवेशनात फक्त वैयक्तिक हेवेदावे आणि आरोप प्रत्यारोपांचीच राळ उडविली जात असल्याचे दिसत आहे.
सत्ताधारी मंडळीने विरोधकांचा आवाज दाबून राष्ट्रवादीचे विधिमंडळाचे नेते जयंत पाटील यांना निलंबित करून लोकशाहीचा एक प्रकारे गळा दाबल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून फक्त ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये भांडणे लावून भारतीय जनता पार्टी आपला स्वार्थ या अधिवेशनामध्ये सुद्धा साधत असल्याचे दिसून आलं.
महापुरुषांचा अवमान आणि सीमावाद या मुख्य प्रश्नावर अधिवेशनामध्ये कसलीही चर्चा झालेली दिसली नाही.
हे सरकार गरिबांचे, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे असे सांगून केवळ गोड गोड बाता मारून सहानुभूती मिळवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा चाललेला हा खोटा खटाटोप राज्यातील जनतेच्या समोर दिसू लागला आहे.
वास्तविक पाहता यंदा परतीच्या पावसानं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी उच्छाद मांडल्यानंतर हाताशी आलेला घास पावसाने पळवून नेला.
जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजावर संकटा मागून संकट आल्यानंतर सुद्धा त्याचा वाली म्हणून हे सरकार अद्याप कोणत्याही प्रकारचा दिलासा देऊ शकलेलं नाही .
दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल असं सरकारने पोकळ आश्वासन दिले. परंतु अद्याप शेतकऱ्यांना या सरकारकडून एक दमडी सुद्धा मिळाली नसल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या सरकारच्या विरोधात बोलू लागला आहे.
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अपेक्षेप्रमाणे चर्चा न करता स्वतःची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी या दोघांनीही इतर विषयांवरच या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा गुराळ गाळलं त्यातून राज्यातील जनतेला काहीही मिळू शकलो नाही असा आरोप राज्यातील नागरिक आणि महिलांमधून न होऊ लागला आहे.
शिंदे गट ठाकरे गटावर आणि ठाकरे गट शिंदे गटावर दिवस-रात्र फक्त टीका टिप्पणी करत आहेत.
महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी विरोधक आणि सत्ताधारी दोघांनाही जिव्हाळा कणव नाही हे आता स्पष्ट दिसू लागलेलं आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्न यावर या अधिवेशनात चर्चा होण्याऐवजी हे हिवाळी अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची उनी धुनी आणि उखाळ्या पाखळ्या काढण्यातच वाया घालू लागले आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे हे फक्त उद्धव ठाकरे गट म्हणजेच ज्या शिवसेनेने तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं त्याच शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं प्लॅनिंग सध्या शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपकडून अधिवेशनामध्ये मोठ्या पद्धतशीरपणे सुरू आहे.
नागपूर मधील भूखंड प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा डाव विरोधकांनी मोठ्या प्रमाणात रचलेला होता. परंतु विरोधकांचं तोंड दाबण्याचा म्हणजेच त्यांना बोलू न देण्याचा आदेश सत्ताधाऱ्यांनी काढून जयंत पाटील यांना निलंबित सुद्धा केल.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना गायरान जमिनींच्या भ्रष्टाचारामध्ये विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं.
एकंदरीत शिंदे गटांच्या चार मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या यादीत ठाकरे गटाने पुराव्यानिशी उभा केलाय.
त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा खतपाणी घातला असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर मधील भूखंड प्रकरणाला चोख उत्तर न देता आल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जुन्या भिजत पडलेल्या एका प्रकरणाला उचलून धरले.
अभिनेत्री दिशा सालीन हिच्या आत्महत्येचं जुनं प्रकरण उकरून काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकाकडून आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
सत्य परेशान होता है लेकिन पराजित नही, याप्रमाणे सत्याला यू टर्न मारून वेगळ्याच प्रकरणांना हात घालून हे अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप करण्यातच गाजवले असल्याचे दिसत आहे.
सत्ताधारी मंडळींनी जुन्या प्रकरणांना हात घातल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सुद्धा पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री रवींद्र राठोड यांचीही चौकशी केली जावी अशी मागणी लावून धरल्यामुळे सत्ताधारी मंडळींची पळता भुई थोडी झालेली दिसत आहे.
कोणत्याही अधिवेशनात शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडून त्यावर चर्चा झाली पाहिजेत धोरणात्मक निर्णय झाले पाहिजेत परंतु या अधिवेशनात मात्र एकमेकांचे उट्टे काढण्याचे प्रयत्न दिसून आल्याने ही गोष्ट छत्रपती, शाहू, फुले व आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आणि अशोबनीय असल्याचे बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment