Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा २७ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न...रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा २७ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न...
रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असून, राज्यात 14 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. सोलापूर जिल्हा साखर पट्टा असून या भागाचा विकास महत्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
 करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. 
   यावेळी महसूल, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा सोलापूर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा. राम शिंदे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार नारायण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, संचालिका रश्मी बागल, महेश चिवटे आदि उपस्थित होते.
       प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पूजन करून, मोळी टाकून कारखान्याचा 27 वा गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रत्येक मंत्रीमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन गती देण्याचा या सरकारने प्रयत्न केला असून त्यातून जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतही जलसंधारण विभागाची तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार काम करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, असंघटित कामगार असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी व्हावा, अशी सरकारची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार असून करमाळा तालुक्यातील विकासाचे प्रकल्प पूर्ण केले जातील, असे त्यांनी सांगितले. 
श्री आदिनाथ कारखान्याचे संस्थापक गोविंदराव पाटील आणि दिगंबराराव बागल यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले, या कारखान्याचे 32 हजार सभासद असून, त्यांची कुटुंबे कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सभासदांच्या हितासाठी कारखान्याचे खाजगीकरण होऊ नये, हा कारखाना सहकारी तत्वावरच चालावा, ही भूमिका ठेवून सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी एकत्रित, एक दिलाने काम करा, सरकार पाठीशी राहील, असे सांगून त्यांनी कारखान्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
    महसूल व आरोग्य विभाग नाविन्यपूर्ण व चांगल्या योजना राबवत असल्याचे कौतुक करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आरोग्य विभागाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेतून महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 4.5 कोटी महिलांची आरोग्य तपासणी होत आहे.
*पालकमंत्री*
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने समयसूचकतेने निर्णय घेतला. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे हित कायम राखले गेले आहे. शेतकऱ्यांना व कारखान्याला नवसंजीवनी देण्याचा अध्याय या कारखान्याने सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचा कारखाना वाचविण्यासाठी भैरवनाथ उद्योग समुहाने आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
*आरोग्य मंत्री*
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत म्हणाले, आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांचा आहे. तो सभासदांचाच राहणार आहे. सभासदांच्या हितासाठी व कारखान्याच्या प्रगतीसाठी भैरवनाथ उद्योगसमुहाकडून यापुढेही या कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.
        यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी सभासद, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments