शेतकरी आक्रमक, कारखानदारांचे आडमुठे धोरण तर वाहतूकदारांची कोंडी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

शेतकरी आक्रमक, कारखानदारांचे आडमुठे धोरण तर वाहतूकदारांची कोंडी

 शेतकरी आक्रमक, कारखानदारांचे आडमुठे धोरण तर वाहतूकदारांची कोंडी



ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे फोडले जात आहे टायर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ऊसदरासाठी संघर्ष समिती आणि कारखान्यांच्या प्रतिनिधींची ऊसदराची बैठक फिसकटल्यानंतर ऊसदर आंदोलन अधिक आक्रमक वळणावर पोहोचले असून रस्त्यारस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फोडले जात आहेत. कारखानदार अन् शेतकऱ्यांतील संघर्ष वाढला असून पन्नासपेक्षा जास्त वाहनांचे टायर फोडून राग काढला आहे.

काल रात्री जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, माढा, माळशिरस, मंगळवेढा इत्यादी भागांमध्ये ५० ते ६० ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले आहेत. या आंदोलनाला शेतकऱ्यांची छुपीसाथ मिळत असून संघर्ष समितीच्या गनिमी काव्याने वाहतुकदार परेशान झाला आहे. दुसरीकडे कारखानदाराच्या बेदखल भूमिकेमुळे हे आंदोलन आता अधिकच आक्रमक होत आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी यांनी काही मार्ग निघण्याच्या अपेक्षेने बैठक बोलावली होती. परंतु कारखानदारांनी याला प्रतिसाद न देता आडमुठे धोरण स्विकारले. त्यामुळे संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे.
ऊसाचा अंतिम दर ३ हजार १०० आणि पहिली उचल २ हजार ५०० रुपयांची द्यावी या मागणीसाठी उसदर संघर्ष समितीने आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. पंढरपूर येथे ऊस परिषद घेवून या मागणीसह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या. कारखान्यांना दोन दिवसांची मुदत दिली होती. कारखान्यांनी या परिषदेच्या मागण्याची आणि आंदोलनाची कसलीही दखल घेतली नाही.
त्यामुळे टप्प्याटप्याने संघर्ष समितीने आपले आंदोलन अधिक उग्र करण्यास सुरुवात केली आहे.
त्याचा परिणाम रस्त्यारस्त्यावर दिसू लागलेला आहे. समिती आणि कारखाने यांच्यातील बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे या आंदोलनाची धार वाढू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात टायरफोड आंदोलन वेग धरू लागले आहे. ऊस दर संघर्ष समिती व साखर कारखानदारांमध्ये ऊस दराची बैठक निष्फळ ठरली आहे. साखर कारखान्याचे चेअरमन या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे काही तोडगा निघण्याचा प्रश्नच आला नाही. या अनुपस्थितीचे तीव्र पडसाद सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात उमटत आहेत.

बार्शी कुर्डवाडी रोडवर शेंद्री स्टेशन व साक्षी पेट्रोलियम रिधोरे दरम्यान आंदोलकांनी ट्रॅक्टरचे चारही टायर फोडले. हा प्रकार हॉटेल शिवरायजवळ घडला आहे. मात्र साखर कारखानदारांनी कारखाना सुरू होऊन जवळपास दहा ते पंधरा दिवस उलटून देखील ऊस दराविषयी आपली भूमिका जाहीर केली नाही.

पंढरपूर तालुक्यात बाजीराव विहीर परिसरात पहिली टायरफोड घटना घडली आणि त्यापाठोपाठ याचे लोण जिल्ह्यात पसरू लागले आहे. पिराची कुरोली फाटा, दसूर पाटी, शेळवे, जुना अकलूज रोड अशी विविध ठिकाणी वाहनाचे टायर फोडले जात आहेत. यामुळे वाहनचालक मालक धास्तावलेले आहेत. आत्तापर्यंत पन्नास साठ वाहनाचे टायर फुटले असून संघर्ष समिती अधिकच आक्रमक होत चालली आहे.

मंगळवेढा तालुक्यात असणाऱ्या चार कारखान्यांची ऊस वाहतूक रोखण्यासाठी बोराळे येथील चौकातच चार ते पाच गावातील शेतकरी एकत्र येत रात्री खडा पहारा देण्यासाठी चक्क विठ्ठलाचा धावा करीत भजन आंदोलन सुरू केले. या भजनाच्या माध्यमातून ‘बा.. विठ्ठला कारखानदारांना सद्धबुद्धी दे’ अशी मागणी करीत रात्र जागून काढली. अशीच अनोखी आंदोलने प्रत्येक गावागावातील चौकात पुढील काळात होणार असल्याचे ऊसदर संघर्ष समितीने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages