Hot Posts

6/recent/ticker-posts

आषाढीनिमित्त वारकरी संप्रदायातील वाद्यांना सुगीचे दिवस; पंढरपुरात पखवाज, वीणा, हार्मोनियमच्या बाजारपेठा सजल्या

आषाढीनिमित्त वारकरी संप्रदायातील वाद्यांना सुगीचे दिवस; पंढरपुरात पखवाज, वीणा, हार्मोनियमच्या बाजारपेठा सजल्या

               पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  पंढरपूर श्रीक्षेत्री तयार होणाऱया वारकरी संप्रदायातील वीणा, पखवाज, तबला, ढोलकी, हार्मोनियम आदी वाद्यांना मोठी मागणी असते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वाद्यांची ही दुकाने सजली असून, ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

               कोरोनातील दोन वर्षांचा काळ आर्थिकदृष्टय़ा बिकट गेल्याने वाद्य कलाकार आणि व्यापारी आर्थिक संकटात सापडले होते. यंदा मोकळ्या वातावरणात आषाढी वारी भरत असल्याने, वाद्यांची मोठय़ा संख्येने विक्री होईल, असा विश्वास व्यापारी बाळगून आहेत. वीणा, पखवाज, तबला-डगा, एकतारी विना, चिपळी, ढोलकी, हार्मोनियम ही पारंपरिक वाद्ये एक हजारांपासून 30 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

               पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावर वीणेगल्ली या नावाने वाद्यांची भली मोठी बाजारपेठ विसावली आहे. देशभरातून आलेले वारकरी या बाजारपेठेत फेरफटका मारून आपली वाद्ये खरेदी करतात. खासकरून पखवाज आणि वीणा या वाद्यांना मोठी मागणी असते. कोरोनामुळे दोन वर्षे भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातलेली होती. त्यामुळे वाद्यांना मागणी नव्हती. कोरोना कमी झाल्यानंतर आषाढी वारी पहिल्यांदा भरत असल्याने 12 ते 15 लाख वारकरी भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.

               गेल्या आठवडाभरापासून पंढरीत भाविकांची वर्दळ वाढली असून, वाद्यांची मोठी उलाढाल होत असल्याचे वाद्य व्यापारी सुधीर पुली यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments