Hot Posts

6/recent/ticker-posts

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना यात्रा अनुदानात भरघोस वाढ, सोलापूर जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायतींना दीड कोटींचे वाटप

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना यात्रा अनुदानात भरघोस वाढ, सोलापूर जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायतींना दीड कोटींचे वाटप

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यास यात्रा अनुदान म्हणून पहिल्या टप्प्यात 1 कोटी 57 लाख 50 हजार रुपये 1 जुलै रोजी वितरित करण्यात आले आहेत. यंदा पालखीमार्गावरील ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱया ग्रामपंचायतींचे अनुदान भरघोसपणे वाढवले आहे.मुक्काम असलेल्या ग्रामपंचायतीस 12 लाख रुपये, दुपारचा विसावा असलेल्या ग्रामपंचायतीस 5 लाख रुपये आणि पालखीमार्गावरील सर्व ग्रामपंचायतींना 2 लाख 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

             पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी येणाऱया संतांच्या पालखी सोहळ्यास सर्व त्या सुविधा पुरवण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मानाच्या नऊ पालख्या येणाऱया मार्गावरील ग्रामपंचायतींना यात्रा अनुदान देण्यात येते. यामध्ये पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी आणि मोहोळ या तालुक्यांतील 71 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

             मागील दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळे आले नव्हते. त्यामुळे ग्रामपंचायतींना यात्रा अनुदान दिले नव्हते. यंदा मात्र मोठय़ा संख्येने भाविक पालखी सोहळ्यासोबत येत आहेत. या सर्व भाविकांच्या मूलभूत सुविधांसाठी ग्रामपंचायतींना अनुदान मंजूर झाले आहे. जिल्हा परिषदेने जिह्यातील सर्व मार्गांवर असलेल्या 71 ग्रामपंचायतींना अनुदान मंजूर केलेले आहे. यापैकी श्रीसंत ज्ञानेश्वर आणि श्रीसंत तुकाराम महाराज पालखीमार्गावरील ज्या गावात पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे, त्या ग्रामपंचायतीला 12 लाख रुपये, ज्या गावात पालखी सोहळ्याचा दुपारचा विसावा आहे त्या ग्रामपंचायतीला 5 लाख रुपये, ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून पालखी सोहळा जाणार आहे, त्या ग्रामपंचायतींना अडीच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

             गोपाळपूर आणि शेगाव दुमाला या पंढरपूर शहरालगत असलेल्या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी 15 लाख रुपये अनुदान रक्कम मंजूर केली आहे. या 71 ग्रामपंचायतींना एकूण 3 कोटी 15 लाख रुपये निधी मंजूर आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 1 कोटी 57 लाख 50 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. या हिशोबाने मुक्कामाच्या ग्रामपंचायतीला 6 लाख, विसावा असलेल्या ग्रामपंचायतीस 2 लाख 50 हजार रुपये आणि पालखीमार्गावरील ग्रामपंचायतींना 1 लाख 25 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.

             योग्य वेळी अनुदान मिळाले श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सोलापूर जिह्यात आगमन झाले आहे. तर,(दि. 5) श्री संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्याचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर योग्य वेळी अनुदान रक्कम मिळाल्याने ग्रामपंचायतींच्या कामास गती आली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments