बेंबळे येथे ग्रीन व्हिलेज फाऊंडेशन तर्फे शालेय साहित्य आणि खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत....

विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, उत्साह आणि आनंद.....
बेंबळे (कटूसत्य वृत्त):- कोरोना काळातील टाळेबंदी नंतर यावर्षी प्रथमच शाळा नियमित सुरू झाल्या असून बेंबळे ता माढा येथील ख्यातनाम व सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पंचक्रोशीत ठसा उमटवलेली सामाजिक संस्था ग्रीन व्हिलेज फाऊंडेशनने आपल्या गावातील गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देऊन आणि खाऊची पॅकेट वाटून त्यांचे उत्साहात स्वागत केले. या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांसाठी कायमच नवीन नवीन प्रयोग केले जात असून गावातील विद्यार्थ्यांना सुद्धा आधुनिक व 21 व्या शतकातील आवश्यक शिक्षण व जगण्याची कौशल्ये प्रदान करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेची गोडी लागावी व त्यांचा शालेय प्रवासाची सुरुवात आनंदी व्हावी या हेतूने प्रत्येकाला एक खाऊ पॅकेट व एक पेन भेट देण्यात आले. गावातील श्री विमलेश्वर विद्यालयातील काही विद्यार्थ्यांची ठराविक निकषांच्या आधारे निवड करून त्या विद्यार्थ्यांना वर्षभर पुरतील एवढ्या वह्या पेन पेन्सिल कंपास फुटपट्टी आणि सॅक इ.शालेय साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
कोरोना पश्चात उद्धभवलेल्या अनेक आर्थिक अडचणींमुळे संकटात सापडलेल्या या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचा भार या मदतीमुळे थोडासा हलका झाला आहे. ग्रीन व्हिलेज च्या या उपक्रमाचे सर्व स्तरातील व्यक्तींकडून स्वागत व कौतुक केले जात आहे.
0 Comments