विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक - उपमुख्यमंत्री पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक - उपमुख्यमंत्री पवार

विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक - उपमुख्यमंत्री पवार

                मुंबई (कटूसत्य वृत्त):- शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून आता जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण आणि कौशल्य ओळखून त्यामध्ये त्यांना पारंगत करणारे जगातील सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा.

                यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील बदल, जागतिकीकरणातील अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 'महाराष्ट्र यंग लिडर्स अस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम' ची सुरूवात होत आहे. याअनुषंगाने 'एचसीएल' तसेच 'ईएन पॉवर' यांच्यासमवेत दोन सामंजस्य करारांचे हस्तांतरण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

                यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार राहूल नार्वेकर, शिक्षण विभागाचे सचिव रनजितसिंह देओल, समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे आदींसह एचसीएल आणि ईएन पॉवर कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञानावर भर देऊन कौशल्य विकास, जगाला सामोरे जाण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समजून घेणे गरजेचे असून शिवराज्याभिषेक दिनी हे करार होणे हा चांगला योग आहे. प्रा. वर्षा गायकवाड यांनी हा योग साधून आजच्या दिवशी या कार्याचा शुभारंभ केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून स्पर्धेच्या युगात टिकून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी हे करार महत्त्वपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. येथेच न थांबता अभ्यासक्रमाचा आशय आणि विषय बदलून बदलांसोबत जुळवून घेणारे तसेच उद्योजकतेची मानसिकता निर्माण करणारे शिक्षण द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे- बाळासाहेब थोरात

                बुद्धीमत्ता ही कुठेही असू शकते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाडी-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कोविडच्या प्रादूर्भावामुळे प्रत्यक्ष शिक्षणावर मर्यादा आल्या होत्या. आता दोन्ही करारांच्या माध्यमातून शिक्षण विभाग नवी झेप घेण्यासाठी सज्ज झाला असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे आणि विद्यार्थी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम झाला पाहिजे, यासाठी प्रा.वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभाग करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य-वर्षा गायकवाड

                आपला देश तरूणांचा देश आहे. विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य तर आजचे अस्तित्व आहेत. त्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकता बाबत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आज एचसीएल आणि ईएन पॉवर यांच्यासमवेत सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले आहे. यापुढे इतरही सर्व क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages