११ वी प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून! १८ जुलैपासून सुरु होणार महाविद्यालये
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिकेची प्रतीक्षा आहे. दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (ता. २४) पासून सुरू होणार असून, प्रवेशासाठी तीन फेऱ्या असतील. १८ जुलैपासून कॉलेज सुरू होतील, असे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.
राज्यातील मुंबई पालिका क्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर येथील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे. जिल्ह्यातील ३५ हजार १०२ मुले तर २८ हजार ९४ मुली दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यापैकी जवळपास ५४ हजार विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. केवळ आठ हजार १६९ मुलांना ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण आहेत. दुसरीकडे, कला शाखेसाठी १७ हजार प्रवेश दिले जातील. विज्ञान अभ्यासक्रमाच्या ३२ हजार तर वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या २३ हजार ५०० जागा आहेत. व्यावसायिक व टेक्निकल अभ्यासक्रमाच्या दोन हजार ८० जागा आहेत. विद्यार्थी संख्येपेक्षा अधिक प्रवेश क्षमता आहे, पण विद्यार्थ्यांना पाहिजे त्या कॉलेजमधून अकरावीला प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करून प्रवेश फेरीची वाट पाहावी लागणार आहे. मागील काही वर्षांत बहुतेक मुलांचा कल विज्ञान व वाणिज्य शाखेकडे असल्याने कला शाखेच्या अनेक तुकड्या बंद पडल्या आहेत. ग्रामीण तथा तालुक्याच्या ठिकाणच्या महाविद्यालयांना एटीकेटीचे विद्यार्थी घेऊन तुकडीची पटसंख्या पूर्ण करावी लागत आहे. बहुतेक महाविद्यालयांनी शिक्षकांना गावोगावी फिरवून विद्यार्थी जमा करण्याच्या सूचना केल्याचेही चित्र आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे म्हणून २५ दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाने केल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
- अकरावी प्रवेशासंदर्भात आज (बुधवारी) येणार शासनाचे नोटिफिकेशन (मार्गदर्शन)
- प्रवेशाचे वेळापत्रक निश्चित; शुक्रवारपासून अर्ज भरण्यास प्रारंभ
- २५ दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन; सुटीतही सुरू राहणार कामकाज
- १८ जुलैपासून सुरू होतील जिल्ह्यातील अकरावीची महाविद्यालये
- विज्ञान व वाणिज्य शाखेकडे वाढला कल; शहरात पाहायला मिळते स्पर्धा
0 Comments