पोस्टाद्वारे मिळकतकर पावत्यांचे वाटप

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका कर आकारणी विभागाकडून इतिहासात प्रथमच पोस्टाने मिळकतकर पावत्यांचे वाटप होणार आहे. या पोस्ट प्रक्रियेमुळे महापालिकेला साधारण ३५ लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.महापालिका कर विभागाच्या माध्यमातून केवळ मिळकत बिलाचे वाटप व वसुली याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर होती. कर विभागातील कर्मचाऱ्यांची ठरलेली कामाची पद्धत आणि कर्मचाऱ्यांची वसुली रक्कम देखील ठरलेली होती. ही जुनाट कार्यपद्धती बंद करून कर विभागामध्ये अद्ययावत प्रणाली उपयोगात आणून महसूल वाढविण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या.तसेच कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये वाढ करीत वॉटर ऑडिट, वाढीव पुरवणी बिलाचे वाटप, ओबीसी डाटा संकलन, बोगस नळांचा शोध आदी अतिरिक्त कामांचा समावेश केला. महापालिकेच्या आर्थिक हितासाठी या सगळ्या बाबी योग्य असल्या तरी कामचुकारपणा अंगवळणी पडलेल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व्हेत बऱ्याच त्रुटी आढळून आल्या आहेत. मिळकतींमधील वाढीव बिलाबाबत तांत्रिक चुका आढळून आल्याने एक लाख ८ हजार बिलांपैकी ५५ हजार बिले रद्द करण्याची वेळ आली. यावेळी देखील छपाई झालेले ५५ हजार बिले धूळखात पडून आहेत.
मिळकतींमध्ये झालेल्या बदलानुसार वाढीव बिल न देता नियमित बिलांची वाटप प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी पुन्हा दोन लाख १० हजार मिळकत कर पावत्यांची छपाई झाली. त्यातील एक लाख ४० हजार मिळकतींना पोस्टमनद्वारे मिळकत कराचे बिल मिळणार आहे आणि उर्वरित साधारण ७० हजार मिळकतींना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कर पावत्या वाटप केल्या जाणार आहेत. परंतु, पोस्टामुळे महापालिकेच्या खर्चात वाढ झाली आहे. साधारण ३५ लाख रुपयांचा आर्थिक भुर्दंड महापालिकेला बसणार आहे. हा खर्च महापालिका नागरिकांच्या खिशातूनच वसूल करणार असल्याने याचा अप्रत्यक्ष आर्थिक फटका शहरवासीयांना बसणार आहे.
0 Comments