Hot Posts

6/recent/ticker-posts

अवयवदानाची लोकचळवळ व्हायला हवी : आरोग्य मंत्री

 अवयवदानाची लोकचळवळ व्हायला हवी : आरोग्य मंत्री

'दोस्त'च्या अवयव दान दिंडीला आरोग्य मंत्री टोपे यांना दाखवला झेंडा

मुंबई (नासिकेत पानसरे):-अवयवदानाची चळवळ लोक चळवळ व्हायला हवी. त्यासाठी जाणीव  जागृती करायला हवी, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.

दोस्त फाउंडेशनच्या वतीने आयोजित अवयव दान दिंडीस आज प्रारंभ झाला. मंत्री राजेश टोपे यांनी अवयव दानाचे महत्व सांगणार्या चित्र रथास ध्वज दाखवून दिंडीस प्रारंभ केला. मलबार हिल येथे टोपे यांच्या बंगल्यावर हा कार्यक्रम झाला. यानंतर या दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. गेली सात वर्षापासून ही दिंडी आषाढी वारीत सहभागी होऊन जाणीव जागृतीचे कार्य करीत आहेत.यावेळी दोस्त फाउंडेशनचे डॉ. कैलास जवादे , डॉ. वैशाली जवादे, डॉ. गोविंद जवादे, डॉ.स्मिता माने,प्रमोद चुंचूवार विजय कोहाड आदी उपस्थित होते. तसेच या दिंडीत सामील होणारे विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, आपल्या देशात अनेक नागरिकांना विविध अवयवांची प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता आहे. मात्र त्या प्रमाणात अवयव उपलब्ध होत नाहीत. अनेक नागरिकांना अवयव मिळत नाहीत. त्यामुळे अवयवदानाबाबत समाजात जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दोस्त फाउंडेशनच्या वतीने केली जाणारी जाणीव  जागृती महत्वाची आहे. “या दिंडीत कीर्तन भारूड पथनाट्य चित्रफिती यांच्या माध्यमातून अवयव दानाबाबत जागृती केली जात आहे. यामुळे राज्यातील अवयव दानाचे प्रमाण वाढण्याला मदत होईल ," असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. 

अवयव दानाबाबत माहिती देणारा एलईडी चित्ररथ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. या चित्ररथावर पथनाट्य लघुपट यांच्या माध्यमातून जाणीव जागृती केली जाईल. या दरम्यान अवयवदानाबाबत असणारे गैरसमज दूर करणे, समाजात सकारात्मक विचार रुजवणे हे काम केले जाणार आहे, असे डॉ. जवादे  यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments