तब्बल चोवीस वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
.png)
जुन्या आठवणींना दिला उजाळा; शिक्षकांना आनंदाश्रू अनावर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे सौ.गोपाबाई रामकिसन पापाशेठ बलदवा हायस्कूल मधील सन 1997- 98 या वर्षातील इयत्ता दहावी वर्गात तून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा तब्बल चोवीस वर्षांनी स्नेह मेळावा शाळेत संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक पांडुरंग सोलंकर तर अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मारुती मडवळी हे उपस्थित होते.तसेच संजय चौगुले, जयश्री शिंदे, भारत केत ,सतीश सावंत ,हरिदास वाघमारे ,दत्तात्रय पवार ,वाय. एस .माळी ,एस .एस. कुचेकर ,डी.बी पारडे ,के. व्ही.मोरे, व्ही. एस. पवारआदि शिक्षकां समवेत शाळेतील शिपाई वर्ग व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.या वेळी देगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक व स्कूल कमिटीचे सदस्य सिद्राम एकनाथ कराळे व माजी विद्यार्थिनी मीरा गुंड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमास उपस्थित शाळेतील आजी-माजी शिक्षकांचा व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प, पेन ,ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करून स्वागत करण्यात आले.
माजी विद्यार्थी दीपक कांबळे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत स्नेह मेळाव्याचे आयोजन, संकल्पना, नियोजन या बाबतची माहिती दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना माजी विद्यार्थी प्रदीप नामदे यांनी करून रयत शिक्षण संस्थेची स्थापना, देगाव येथील शाळेचा प्रवास, मुख्याध्यापक व शिक्षकांनी आमच्यासाठी घेतलेले परिश्रम तसेच या शिक्षकांमुळेच आज आम्ही यशस्वी झालो व घडलो असे सांगत याचे सर्व श्रेय गुरुजन वर्गाला जात असून आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो व घडलो याचा आम्हाला आनंद व अभिमान असल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शाळेचे माजी मुख्याध्यापक पांडुरंग सोलंकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की ,शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवताना किंवा घडवताना आम्ही आमच्या पगाराचा कधीही विचार केला नाही. मला माझा स्टाफ सुद्धा चांगला मिळाला होता. मुलांना खाजगी शिकवणी कधीही लावायची गरज पडू दिली नाही. त्याचबरोबर देगाव गावातील अनेक लोकांना आम्ही भेटलो व शाळेसाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्यासाठी प्रबोधन केले आणि गावातील लोकांनी सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. तुमच्या बॅच नंतरच आपल्या शाळेला 25 टक्के अनुदान मिळायला सुरुवात झाली त्यामुळे तुम्ही विद्यार्थी आमच्यासाठी खूप लकी होतात असे सांगत मुलांनो जीवनात त्याग करायला शिका खूप पुढे जाल, व्यसनापासून दूर राहा, आपल्या कुटुंबीयांसाठी वेळ द्या असे अनेक लाख मुलाचे विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक मारुती मडवळी हे बोलताना म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी आयोजन केलेला अशा प्रकारचा स्नेह मेळावा प्रथमच या शाळेत संपन्न होत असून इतरही माजी विद्यार्थ्यांनी याचे अनुकरण करून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या भेटवस्तूचे कौतुक केले.
त्याचबरोबर इतर उपस्थित शिक्षकांनी त्या काळातली शिक्षण पद्धती आणि आताच्या काळातली शिक्षण पद्धतीचा उल्लेख करीत माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे व मिळवलेल्या यशाचे कौतुक करत डोळ्यात पाणी आणले.त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले कुटुंब व शिक्षणाचा प्रवास उद्योग व्यवसाय आदी गोष्टीबाबत व्यक्तिशः माहिती दिली.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दोन हजार लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी , ग्रीन ग्लास बोर्ड व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यासाठी रोपे भेट स्वरूपात दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी दीपक कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महादेवी भुसारी यांनी मानले.
0 Comments