Hot Posts

6/recent/ticker-posts

द्राक्ष पिकातील एप्रिल छाटणी व्यवस्थापन या विषयावर,शेतकरी संवाद कार्यशाळा संपन्न,विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर प्रकल्पाचा उपक्रम

द्राक्ष पिकातील एप्रिल छाटणी व्यवस्थापन या विषयावर,शेतकरी संवाद कार्यशाळा संपन्न,विठ्ठलगंगा फार्मर्स  प्रोड्युसर प्रकल्पाचा उपक्रम 


माढा (कटूसत्य वृत्त):-रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक खतांवरती भर द्यावा असे मत राष्ट्रीय  द्राक्ष संशोधन  केंद्राचे संचालक डॉ.आर.जी.सोमकुंवर यांनी व्यक्त केले.माढा तालुक्यातील  निमगाव (टे) येथील विठ्ठलगंगा फार्मर्स प्रकल्पाच्या क्षेत्रावर द्राक्ष पिकातील एप्रिल छाटणी व्यवस्थापन करण्या संदर्भात आयोजित  शेतकरी संवाद कार्य शाळेत डाॅ.सोमकुंवर बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी  अधीक्षक   बाळासाहेब शिंदे हे तर अध्यक्षस्थानी  प्रकल्पाचे  चेअरमन धनराज शिंदे होते.डाॅ.सोमकुंवर बोलताना पुढे म्हणाले,द्राक्ष पिकावरती होणारे नवनवीन संशोधन आणि उपलब्ध शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवण्यासाठी  द्राक्ष संशोधन केंद्र नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगुन क्लोन” ही द्राक्षाची जात शेतकऱ्यांना बेदानासाठी फायद्याची ठरत आहे. त्याचबरोबर “मांजरी किसमिस” ही जात देखील शेतकऱ्यांना बेदाना निर्मितीसाठी खूप फायदेशीर ठरत असून शेतकऱ्यानी या जातीस पसंती देऊन मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे आवाहन सोमकुंवर यांनी केले.द्राक्ष उत्पादनातील सूर्यप्रकाशाचे महत्व या विषयावरती सखोल मार्गदर्शन त्यांनी केले.तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.निशांत देशमुख म्हणाले द्राक्ष वेलींना मुबलक सूर्यप्रकाश मिळाल्यास जास्त प्रमाणात प्रकाश संश्‍लेषण क्रिया घडून येते पर्यायी कार्बोहायड्रेटचे संचयन होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते. याकरिता वेलींचे कॅनॉपी व्यवस्थापन करणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.द्राक्ष पिकामध्ये मालाच्या तोडणी नंतर करण्यात येणाऱ्या खरड (एप्रिल छाटणी) छाटणी शास्त्रीय पद्धतीने होणे जरुरीचे असल्याचे देशमुख यांनी म्हटले.द्राक्षेचे दर्जेदार व भरघोस उत्पादन घेण्यासाठी कॅनॉपी व्यवस्थापन तसेच काड्यांची संख्या-जाडी, पानांचा आकार -संख्या इ. बाबींचे सूक्ष्म नियोजन केल्यास पीक रोगांना कमी बळी पडते व सूर्यप्रकाश सर्वत्र खेळता राहिल्याने उत्पादनात वाढ होते असे ते म्हणाले.सध्याच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष शेती बऱ्याच अंशी फायदेशीर ठरत असून शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन  आवश्यक असुन द्राक्ष लागवडीसाठी चालना देण्यासाठी लवकरच “मनरेगा” योजनेमध्ये यासंबंधीचा शासन निर्णय येणार असल्याचे जिल्हा कृषी  अधीक्षक  बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.प्रकल्पाचे चेअरमन धनराज शिंदे यांनी  भविष्यात शेतकर्यांनी निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनावरती भर देणे आवश्यक असून प्रकल्पा द्वारे  उभारण्यात आलेल्या अद्ययावत पॅकहाऊस चा फायदा  घेण्याचे  आवाहन उपस्थित शेतकर्याना करुन प्रत्येक तालुक्यात सुसज्ज पॅक हाऊस,निर्यात सुविधा केंद्र उभारणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील,प्रकल्पाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील,कंपनीचे संचालक पोपट खापरे,नितीन कापसे,महेश मारकड,महेश डोके,प्रशासकीय अधिकारी राहुल वरपे यांचेसह द्राक्ष उत्पादक शेतकरी बहुसंख्येने  उपस्थित होते.आभार नितीन कापसे यांनी मानले. 

Reactions

Post a Comment

0 Comments