लीलावती रुग्णालय विरोधात शिवसेनेची पोलिसात तक्रार
मुंबई, (नासिकेत पानसरे): खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयात विशेष वागणूक देताना एमआरआय कक्षात मोबाईल किंवा कॅमेरा घेवून जाण्यास आणि फोटो काढू देण्यास परवानगी देणाऱ्या लीलावती रुग्णालय प्रशासन विरोधात शिवसेना आज अधिक आक्रमक झाली. सेनेने आज बांद्रा पश्चिम पोलीस ठाण्यात लीलावती रुग्णालय प्रशासन विरोधात लेखी तक्रार दाखल केली.
सेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ आणि युवा सेनेचे राहुल कणाल यांनी मंगळवारी लीलावती रुग्णालयात धडक देवून प्रशासनाला धारेवर धरले होते. आज या चौघांनी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशन गाठून रुग्णालय विरोधात तक्रार दाखल केली.
या तक्रारीत शिवसेनेने नमूद केले आहे की, रुग्णालयाच्या छापील नियमावलीनुसार रुग्णालयात फोटोग्राफी करण्यास परवानगी नाही. असे असताना नवनीत राणा यांची एम आर आय चाचणी सुरू असताना त्याचे फोटो समाज माध्यमात आल्याने रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राणा यांचे हे फोटो कोणी काढले त्याची चौकशी होवून दोषीवर कारवाई व्हावी, एमआरआय कक्षाच्यामागे ऑक्सिजन प्लांट आहे. काही दुर्घटना घडली असती तर रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आली असती. त्याला जबाबदार कोण राहिले असते? असा प्रश्न सेनेने उपस्थित केला आहे.
खासदार राणा यांच्यासोबत असणारे बंदूकधारी अंगरक्षक रुग्णालय आवारात शस्त्रासह फिरताना दिसत होते. याकडे लक्ष वेधून सेनेने तक्रारीत नमूद केले आहे की, रुग्णालयाच्या नियमावलीनुसार हत्यार घेवून रुग्णालय आवारात प्रवेश दिला जात नाही. मग हेच अंगरक्षक बंदूक घेवून एम आर आय कक्षात वावरत होते का? याची सीसीटिव्ही फुटेज बघून चौकशी करण्यात यावी.
या सर्व गंभीर घटना घडत असताना रुग्णालय प्रशासनाने यावर कारवाई करण्याची कोणती भूमिका घेतली याची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे.
0 Comments