माणुसकीला धरून असणारा भारतीय विवेकवाद रुजविणे आवश्यक - अविनाश पाटील

पंढरपूर, (कटुसत्य वृत्त): सध्याचे गटा-तटात विभागलेले पुरोगामीत्व मुळावर आले असून ते परस्पर पूरक ठरण्याऐवजी परस्परविरोधी ठरत असल्याबद्दल अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी चिंता व्यक्त केली. भक्ती संप्रदयाचीही अशीच अवस्था असल्याचे त्यांनी निरीक्षण नोंदवले. आम्हाला पाश्चात्य विवेकवाद नको असून माणुसकीला धरून असणारा भारतीय विवेकवाद रुजविताना लोकांच्या भावना विचारात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मानवतेला केंद्रबिंदू मानणाऱ्या संतांच्या विचारांची पेरणी करण्यासाठी संत तुकाराम महाराज विद्यापीठाची स्थापना व्हावी व पंढरीचा महिमा सांगणारे प्रवक्ते तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विवेक जागर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर काढण्यात आलेल्या 'वारसा संतांचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा' या जनप्रबोधन यात्रेच्या सांगता समारंभाप्रसंगी ते पंढरपूर येथे बोलत होते. यावेळी विचारमंचावर संत साहित्याचे अभ्यासक सचिन परब, श्यामसुंदर सोन्नर महाराज, राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष राजा अवसक, भोजलींग महाराज संस्थानचे उत्तराधिकारी ज्ञानेश्वर बंडगर, माधव बावगे, अंनिसचे सरचिटणीस ऍड.गोविंद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आज समाजात असहिष्णुतेचा आणि धर्मांधतेचा वणवा पेटविला जात असून तो केवळ संतविचारानेच विझू शकतो. या पार्श्वभूमीवर अंनिसने काढलेली ही जनप्रबोधन यात्रा काळाची गरजच होती, असे मत संत साहित्याचे अभ्यासक व साहित्यिक श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी व्यक्त केले.
सचिन परब म्हणाले की, आज चुकीच्या परंपरा सांगून जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संत परंपरा नीट समजून घेऊन त्यांचा वारसा चालविण्याची गरज आहे. बलुतेदार संतांच्या कामात मदत करणारा पांडुरंग खऱ्या अर्थाने श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देतो असे सांगून साने गुरुजींची परंपरा हेच खरे वारकरी संप्रदायाचे अर्क असल्याचे ते म्हणाले. माधव बावगे यांनी माणूस नितीमान आणि विवेकी बनला पाहिजे ही अंनिसची भूमिका असून देव, धर्म, जातीच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाला अंनिस विरोध करते, असे सांगितले. त्यांनी जनप्रबोधन यात्रेदरम्यान मुक्ताईनगर येथे प्रथम झालेला विरोध व नंतर संवादातून अंनिस विषयी असणारे गैरसमज दूर करण्यात असलेले यश याचा अनुभव सांगितला. आज संतांच्या होऊ घातलेल्या दैवतीकरणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ज्ञानेश्वर बंडगर यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे कार्य संत गाडगेबाबा आणि साने गुरुजींनी चालू ठेवल्याचे सांगून संतांचा वारसा नष्ट करण्याचा अनेक राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पण सर्वसामान्यांनी अधिक जोमाने तो टिकवून ठेवला असल्याचे सांगितले. राजेंद्र अवसट यांनी संत चळवळीने समाजातील शहाणपण शोधून चांगुलपणा पेरण्याचे काम केल्याचे सांगितले. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे संविधानाचा कृतीविचार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सदर जनप्रबोधन यात्रा संत नामदेवांच्या वाटेवरून अशीच पुढे चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मनोहर जायभाय यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी जनप्रबोधन यात्रेदरम्यान आलेले अनुभव विशद करून अनेक ठिकाणी अंनिस म्हणजे देव धर्माच्या विरोधात असलेली संघटना हा गैरसमज दूर करण्यात यश आल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अनिल करवीर यांनी केले तर आभार सुधाकर काशीद यांनी मानले.
0 Comments