Hot Posts

6/recent/ticker-posts

शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नियमित योग आवश्यक - योगगुरू मनमोहन भुतडा

शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नियमित योग आवश्यक - योगगुरू मनमोहन भुतडा

माहिती प्रसारण मंत्रालयाचा योग उत्सव 2022 उपक्रम

         सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित योग करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शरीर मन आणि आत्मा एकमेकांना जोडले जातात आणि शांततेची अनुभूती प्राप्त होते, असे मत योग सेवामंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ योगगुरू मनमोहन भुतडा यांनी येथे व्यक्त केले.

         भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय लोकसंपर्क ब्‍युरो, सोलापूर आणि योगसेवा मंडळ, सोलापूर यांच्या वतीने आयोजित ‘योगउत्सव 2022’ या कार्यक्रमात श्री. भुतडा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, योगसेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील आळंद, सचिव जितेंद्र महामुनी, सुजाता बीडकर, सतीश अग्रवाल, आनंद काळे, माजी अधिकारी सतीश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

         श्री. भुतडा म्हणाले, आठव्‍या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विशेष पंधरवडा योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. योग हा एक दिवस करण्याचा नसून तो आपल्या दररोजच्या दिनचर्येचा एक भाग झाला पाहिजे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच शिवस्मारक येथे होणाऱ्या योग शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि आंतरराष्ट्रीय योग दिन यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

         श्री.चव्‍हाण म्‍हणाले, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत देशभर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. योगाचे प्रशिक्षण सर्वांना मिळावे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा या उद्देशाने भारत सरकारच्या प्रत्येक मंत्रालयाला ‘योगउत्सव 2022’ अंतर्गत 75 कार्यक्रम देण्यात आलेले आहेत. त्यापैकी 39 व्‍या कार्यक्रमाची जबाबदारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या योग कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. जेणेकरून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना योगाचे प्रशिक्षण मिळावे आणि योग हा शास्त्रीय पद्धतीने केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

         यावेळी उत्‍कृष्‍ट योग प्रशिक्षणार्थींना पारितोषिके देण्‍यात आली त्‍यांची नावे खालीलप्रमाणे आहेत- आदिती सासवडे, मृणाली सरवदे, सुप्रिया कवठे, स्‍वानंदी माळगे, महेश सरवदे, भाविन शहा, श्री सातवेकर, श्री नवले श्री पाये आदी. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल आळंद यांनी केले. कार्यक्रमासाठी जब्‍बार हन्‍नूरे, श्रीशैल शिंदे यांनी परिश्रम घेतले. 

Reactions

Post a Comment

0 Comments