वाफेगाव-बेंबळे बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती ; बंधारा कोरडा होण्याच्या अवस्थेत

ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी पाणीटंचाईचीभीतीतातडीने नवीन दरवाजे बसवून गळती थांबवावी - शेतकऱ्यांची मागणी
बेंबळे : वाफेगाव-बेंबळे बंधाऱ्याला मागील एक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गळती लागलेली असल्यामुळे या बंधाऱ्यात येणारे पाणी पूर्णपणे वाहून जात आहे व हा बंधारा सध्या कोरडा पडण्याच्या अवस्थेत आहे. या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या वाफेगाव, बेंबळे,मिटकलवाडी ,हरिनगर- भोसलेवस्ती,माळेगाव, शेवरे,व बाभळगाव इत्यादी गावातील हजारो शेतकऱ्यांनी या बंधाऱ्याला तातडीने नवीन बर्गे (दरवाजे) बसउन खाली वाहून जाणारे पाणी थांबवण्यात यावे अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की सतरा ते अठरा वर्षांपूर्वी माननीय विजयसिंह मोहिते- पाटील जिल्ह्याचे पालक मंत्री असताना त्यांनी तसेच आ.बबनदादा शिंदे व स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी शासनामार्फत भीमा नदीवर टाकळी, नरसिंगपूर, वाफेगाव- बेंबळे, मिरे-करोळे, भोसे, गुरसाळे ,पंढरपूर, गोपाळपूर आदी ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. शेतकऱ्यांनी यातील पाण्यावर शेतीसाठी उचल पाणी घेऊन हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आणून आपले आर्थिक जीवनमान उंचावले आहे. वाफेगाव- बेंबळे बंधाऱ्याला एकूण 44 बर्गे( दारे )असून ते सर्व लोखंडाचे आहेत व मागील दोन वर्षापासून सर्व बर्गे कुजून गेले आहेत,मोठी भोके पडली आहेत व त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. अनेक वेळा ही बाब जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा याकडे सर्वानी हेतूपुरस्कर दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. वाफेगाव-बेंबळे बंधाऱ्याच्या खालील बाजूस मिरे- करोळे हा बंधारा आहे, याचे तसेच गुरसाळे बंधार्याचे दरवाजे दोन-तीन वर्षांपूर्वी नवीन बसवलेले आहेत त्यामुळे करोळे बंधाऱ्यातून थोडे देखील पाणी वाहून जात नाही.
सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर प्रत्येक बंधाऱ्याची कांही दारे काढली जातात व नदीत पाणी सोडणे बंद होण्या आगोदर एक दिवस बंधाऱ्याची दारे पुन्हा व्यवस्थित बसवून पाणी अडवले जाते. परंतु वाफेगाव-बेंबळे बंधार्याबाबत कसलीच दखल घेतली जात नाही कारण कुजलेल्या दरवाजातून पाण्याची गळती कायम मोठ्या प्रमाणावर चालू असते. सध्या या गळतीच्या पाण्यामुळे या खालील असलेल्या करोळे बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेले आहे व त्याचे पाणी टेल-एण्ड म्हणजे बेंबळे बंधाऱ्याच्या सुरुवातीपर्यंत मोठा साठा झालेले दिसून येत आहे आणि ह्या सर्व बाबी पाटबंधारे खात्याच्या बंधारे नियंत्रण विभागाच्या गलथानपणामुळे झालेल्या आहेत हे आता लपून राहिलेले नाही . या साठी वाफेगाव- बेंबळे बंधाऱ्याची दारे भक्कम बसउन यातील पाण्याची गळती तातडीने थांबवावी अशी हजारो शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे. अगोदरच विद्युतपुरवठ्याचा सर्वत्र खेळखंडोबा झालेला आहे व त्यातच आता बंधाऱ्यातील पाणी गळतीमुळे कमी होऊ लागल्यामुळे भीमा नदीकाठी बसवलेल्या शेकडो मोटारी पाण्याअभावी बंद पडतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन, उपोषण, धरणे आदी मार्गाचा अवलंब करावा लागेल असे बोलले जाते. सध्या भीमा नदीत सोलापूर शहरासाठी धरणातून सोडलेले पाणी 26 एप्रिल रोजी बंद करण्यात आले आहे व वाफेगाव बेंबळे बंधाऱ्यातील पाणी चार ते पाच दिवसात वाहून गेले आहे,व असे नेहमीच होत आहे पण कोणीही दखल घेतलेली नाही त्यामुळे शेतकरी अतिशय चिंताग्रस्त आहेत.
0 Comments