आझादी का अमृत महोत्सव निमित्त प्रधानमंत्री साधणार नागरिकांशी संवाद
.jpeg)
सर्व विभागांनी योजनांच्या लाभार्थ्यांबाबत नियोजनबद्ध आराखडा तयार करावा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
सोलापूर, (कटुसत्य वृत्त): आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याने तयारी करण्याच्या सूचना केंद्रीयस्तरावरून मिळालेल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक विभागांनी तयारी करावी. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांबाबत नियोजनबद्ध आराखडा तयार करून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
आझादी का अमृत महोत्सव नियोजन बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, मनपाच्या उपायुक्त विद्या पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनांच्या यशस्वी लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री संवाद साधणार आहेत. या योजनेच्या संबंधित विभागाने 20 ते 25 लाभार्थी कार्यक्रमाला घेऊन यावे. शक्यतो लाभार्थी खूप दूरचे निवडू नये. या नियोजनासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे.
प्रत्येक विभागाने आपल्या योजनेबाबत अपडेट राहून माहिती घ्यावी. 26 मे ते 30 मे हा आझादी अमृत महोत्सव कार्यक्रमाचा पहिला टप्पा राहणार आहे. या कालावधीत वेगवेगळी स्लोगन तयार करावीत. प्रत्यक्ष कार्यक्रम 31 मे रोजी होणार असून 1 जून ते 5 जून 2022 हा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राहणार आहे. योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी प्रत्येक विभागांनी निवडावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाला खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब, माजी सैनिक, प्रसिद्ध व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
0 Comments