ठेकेदारांनावर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गत वर्षभरापासून चुकीच्या पद्धतीने वाहतूक वळवल्यामुळे मोहोळ-पंढरपूर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात बळी जात असून अनेक जण गंभीर जखमी होत आहेत. मात्र, महामार्गावर वाहतुकीच्या कोणतेही नियमांचे पालन केले जात नाही. ठेकेदाराच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळेच एकाच महिन्यात अनेकांचे बळी गेले आहेत. याबाबत सदर ठेकेदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मोहोळ तालुका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी यावेळी दिला आहे. मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मोहोळ - पंढरपूर - आळंदी पालखी महामार्ग क्रमांक ९६५ चे काम अंतिम टप्यात आहे. मात्र, संबंधित लोकांनी काम सुरू असताना वाहतुकीसाठी असणाऱ्या योग्य त्या नियमांचे पालन केल्याचे दिसून येत नाही. अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक असून तसे दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अलीकडच्या काळात दुचाकी वाहनासह, चारचाकी वाहनाचे अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. रोजी पेनूर येथील अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा बळी गेला. या सर्व घटनेस संबंधितांना जबाबदार धरून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष चवरे यांनी सांगितले. यावेळी नानासाहेब डोंगरे, नागेश साठे, रामदास चवरे, सरचिटणीस प्रशांत बचुटे, वाफळेचे शरद पाटील, उद्योजक राम कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments