हुतात्मा एक्स्प्रेससह ३३ गाड्या रद्द
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उन्हाळ्याच्या सुटीत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण दौंड येथील कुरकुंभ मोरी येथे रोड अंडरब्रीजचे (पुलाखालील रस्ता) काम हाती घेतले आहे. यामुळे १३ मे ते २९ मे दरम्यान तब्बल १७ दिवसांसाठी ३३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग आणि काही गाड्या अंशतः शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवसात गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्यावतीने दौंड येथील कुरकुंभ मोरीच्या रोड अंडरब्रिजच्या कामासाठी सतरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर सेवेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. अनेक रेल्वेच्या सेवा रद्द केल्या जाणार आहेत. यासह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. परिणामी, प्रवाशांना या ब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्गिका खुली होईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
0 Comments