Hot Posts

6/recent/ticker-posts

देशात केरळ हे आदर्श लोकशाही राज्य - डॉ. उदय नारकर

देशात केरळ हे आदर्श लोकशाही राज्य - डॉ. उदय नारकर

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या भारतात लोकांच्या मुलभूत गरजांपेक्षा धर्म आणि सांप्रदायिकतेला प्राधान्य देणारी यंत्रणा सक्रीय झाली आहे. यामुळे देशांतर्गत ताणताणाव आणि अराजकतेला पोषक वातावरण निर्माण होत आहे. सत्तेतील केंद्र सरकार संविधानाला बाजूला ठेवून एकाधिकारशाहीच्या जोरावर त्यांना अपेक्षित असणारा देश निर्माण करण्यासाठी ना ना तऱ्हेचे प्रयत्न चालवत आहेत. अशावेळी संविधान केंद्रस्थानी ठेवून आपल्या राज्यात रोजगार, शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे अधिकार शाबूत ठेवून लोकशाही उंचाविण्याचे काम केरळ राज्य करत आहे. या आदर्श राज्य कार्यप्रणालीची चर्चा जगभर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीत या राज्यातील आरोग्य यंत्रणा सबंध देशाला दिशा देणारी ठरली. यामुळेच देशात केरळ हे आदर्श लोकशाही राज्य ठरले. असे गौरव उद्गार मार्क्सवादी विचारवंत महाराष्ट्राचे प्रदेश सचिव डॉ. उदय नारकर यांनी सोलापूर येथे झालेल्या जिल्हा सर्वसाधारण सभेत काढले. 

              बुधवार दि. १८ मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली आहे.  

              या सर्वसाधारण सभेत दि. ६ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान केरळ राज्यातील कन्नूर येथे झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २३ वे राष्ट्रीय महाअधिवेशनाचे इतिवृतांत, पुढील कार्याची दिशा व कार्यक्रम याबाबत सविस्तर मांडणी पक्षाचे प्रदेश सचिव डॉ.उदय नारकर यांनी केली. 

              हे राष्ट्रीय महाअधिवेशन दर तीन वर्षाला होत असून यामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती, देशापुढील आव्हाने, टीकात्मक परीक्षण, सरकारची धोरणे, देशाचा विकास, महत्वपूर्ण ठराव अशा विविध विषयांवर देशाच्या विविध राज्यात आलेले प्रतिनिधी द्वारा राष्ट्रीय स्तरावर चर्चा केली जाते. मागील तीन वर्षाचा आढावा व पुढील तीन वर्षासाठी या चर्चेच्या आधारे कार्याची दिशा व कार्यक्रमाची आखणी केली जाते. याची माहिती विविध जिल्ह्यातील सर्व पक्ष सभासदांना देण्यात येते त्या अनुषंगाने सोलापुरात डॉ.उदय नारकर यांनी सर्वसाधारण सभेत माहिती दिली. यानंतर प्रश्नोत्तराचे सत्र पार पडले.  

              यावेळी माकपाचे जिल्हा सचिव कॉ.एम.एच.शेख प्रास्ताविक केले. यावेळी माकपाच्या राज्य नियंत्रण आयोग निमंत्रक पदी कॉ.नरसय्या आडम (मास्तर) तर डॉ. उदय नारकर यांच्या राज्य सचिव पदी, एम.एच.शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी यांची राज्य समिती सदस्यपदी फेरनिवड तर युसुफ शेख (मेजर) यांनी नवनिर्वाचित राज्य सदस्य पदी निवड झाली असून यांचा सत्कार करण्या आला. तसेच डी.वाय.एफ.आय. च्या राज्य उपाध्यक्ष पदी विक्रम कलबुर्गी तर राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अनिल वासम निवड झाली असून त्यांचाही सत्कार करण्यात आला. 

              यावेळी व्यासपीठावर कॉ. शेवंता देशमुख, नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नगरसेविका कामिनिताई आडम, अब्राहम कुमार, युसुफ शेख (मेजर), रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, कुर्मय्या म्हेत्रे आदि उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ. अनिल वासम यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments