Hot Posts

6/recent/ticker-posts

अटींचा भंग केल्या प्रकरणी राणा दाम्पत्यांना कोर्टाची नोटीस

 अटींचा भंग केल्या प्रकरणी राणा दाम्पत्यांना कोर्टाची नोटीस

           मुंबई, (नासिकेत पानसरे): हनुमान चालिसा पठण करण्या प्रकरणी जामीन देताना राणा दाम्पत्यांना कोर्टाने अटी घातल्या होत्या, मात्र तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी मिडीयाशी संवाद साधला.हा कोर्टाने घातलेल्या अटीचा भंग आहे. या प्रकरणी कोर्टाने राणा यांना नोटीस पाठविली असून १८ मे पर्यंत खुलासा मागितला आहे.

           कोर्टाने राणा यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. मात्र त्यानंतरही राणांनी आक्रमकपणा कायम ठेवला आहे. तसेच आपल्यावरील कारवाईवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना आव्हान दिले आहे.

           नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, लोकसभेच्या खासदार म्हणून सभागृहाने आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्याया बाबत मी ओम बिर्ला यांना माहिती देणार आहे. आमच्यावर अत्याचार कसा झाला याची माहिती मी त्यांना देणार आहे. तसेच आमच्यावर झालेल्या अत्याचाराची केंद्राच्या एजन्सीने चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे. कारण राज्याच्या सुरक्षा यंत्रणांकडून न्याय मिळणे कठीण आहे.

           प्रसारमाध्यमांशी साधलेला संवाद आणि कोर्टाने दिलेली  नोटिस या बाबत नवनीत राणा म्हणाल्या की, आम्ही कोर्टाने दिलेल्या आदेशांचं पालन करत आहोत. शेवट पर्यंत आम्ही कोर्टाचा आदर करू. कोर्टाने ज्याविषयी बोलण्यास मनाई केलेली आहे. तो विषय सोडून इतर सर्व मुद्द्यांवर आम्ही बोलू शकतो. त्यामुळे यापुढेही आदेशाचं पालन करत राहू. आम्ही माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय, असा दावा करण्यात आला आहे. मात्र मला वाटतं कोर्टाने घातलेल्या कुठल्याही नियमाचा मी उल्लंघन केलेलं नाही. मी राजकारणात आहे. त्यामुळे टीका करण्याचा माझा अधिकार आहे. त्यामुळे तो विशिष्ट्य विषय वरळून आम्ही बोलत राहू, असे राणा यांनी सांगितले.

           दरम्यान, रुग्णालयातील व्हायरल झालेले फोटो आणि एमआरआय स्कॅनच्या रिपोर्टच्या होत असलेल्या शिवसेना नेत्यांकडून मागणीवर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, मला वाटतं की, त्यांची सत्ता आहे. ते सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. ते माझ्या घरापर्यंत गेले होते. कदाचित ते उद्या लीलावती रुग्णालयाचा तोडण्याचेही आवाहन करू शकतात. त्यांचे क्रूर राजकारण रुग्णालयापर्यंत पोहोचले आहे. केवळ नवनीत राणांचे फोटो व्हायरल झाले होते, बाकीच्यांचे नाही. एमआरआय रिपोर्टबाबत म्हणाल तर कुणाचे खासगी रिपोर्ट मागण्याची गरज काय? आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे रिपोर्ट कधी मागितले का. ते दोन वर्षे आजारी होते. त्यांनी कुठली शस्त्रक्रिया करून घेतली याचे रिपोर्ट दाखवण्याची मागणी केलीय का, जर माझे रिपोर्ट पाहायचे असतील तर आधी उद्धव ठाकरेंनी आधी आपले रिपोर्ट दाखवावेत. त्यानंतर मी माझे पूर्ण रिपोर्ट देईन, असे आव्हान नवनीत राणा यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments