चिमुकल्यांचे नाव झाडाला देऊन वृक्ष संवर्धन करा : अक्षय शहरकर
संभाजीनगर, शिवशाहू उद्यानात काँग्रेस पर्यावरण विभागाचा उपक्रम
पिंपरी (कटुसत्य वृत्त): देशातील नागरिकांचे वार्षिक दरडोई आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार नियोजन व धोरणे आखत असते. त्याचप्रमाणे देशामध्ये देशी वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने धोरणात्मक कार्यक्रम तयार करावा. त्याच्या अंमलबजावणीसाठी विविध सामाजिक संस्थांना, पर्यावरण प्रेमी नागरिकांना बरोबर घ्यावे. देशातील वृक्षलागवडीचे प्रमाण आणि त्याचे जतन व संवर्धन करण्याचे प्रमाण वाढले तरच पुढील पिढीला मोकळा श्वास घेता येईल त्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पर्यावरण विभागाच्या वतीने चिमुकल्यांचे नाव झाडाला देऊन वृक्ष संवर्धन करण्याचा अनोखा उपक्रम शहरातील विविध उद्यानांमध्ये सुरु करण्यात आला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये देखील पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अक्षय शहरकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाने शुक्रवारी (दि.२० मे) शिवशाहू उद्यान, संभाजी नगर येथे वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात केली. यावेळी इंद्रजित गोरे, सिद्धांत रिकीबे, जीवन साखरे, संग्राम रोकडे, मंगेश मोरे, सबा शेख, अरिफ शेख आदींसह लायन्स क्लब पुणे आकुर्डीचे हिरामण गवई, राजेंद्र कोळी, चंद्रशेखर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अबान शेख, आदित्य कणसे, अरमान शाह, सार्थक बिटले, भक्ती नेमाडे, सार्थक कुलकर्णी, अक्षत मोहिते, सोहम विभुते, मन्नत शर्मा, सूजीत गुप्ता, प्रथमेश भांगरे या लहान मुलांनी येथे प्रत्येकी चार झाडे लावण्याची व वाढविण्याची जबाबदारी घेतली. त्यांना पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने आवश्यक ते साहित्य पुरविण्यात येईल अशीही माहिती अक्षय शहरकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
0 Comments