गाव झालं भारी,पण मुतायची चोरी

नागरिकांची होतेय हेळसांड, प्रशासन मात्र बेफिकीर
लऊळ (कटुसत्य वृत्त): माढा तालुक्यातील प्रमुख गाव व तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कापड खरेदीसाठी सुप्रसिद्ध असलेले गाव म्हणून लऊळ गावची ओळख आहे.आसपासच्या खेडेगावाचा बराच व्यवहार येथूनच होत असल्याने गाव हे आर्थिक केंद्रबिंदु मानले जाते. गावातील बाजारपेठ ग्राहकांना आकर्षित करणारी असल्याने व गावाची लोकसंख्याही भरपूर प्रमाणात असल्याने लोकांची वर्दळ देखील जास्त आहे.गेल्या दहा वर्षात गावचा विकासही बऱ्यापैकी झाल्याचे दिसून येत असले तरी गावात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे.गावातील ठिकठिकाणी माणसांची रेलचेल असल्याने व गावात जवळपास मुतारी नसल्याने "गाव झालं भारी,पण मुतायची चोरी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या ना त्या कारणाने बाहेरगावाहून आलेल्या लोकांची विशेषतः महिलांची मुतारी नसल्याने मोठी पंचाईत होत असली तरी महिला सरपंच असलेली ग्रामपंचायत मात्र याकडे डोळेझाक करत आहे.विकासकामांच्या नावाखाली लाखों रुपयांची उधळण करणारे गावचे प्रशासन स्वच्छतागृहासाठी केंव्हा निधी खर्च करणार याकडे गावकऱ्यांबरोबरच पंचक्रोशीतील लोकांचे लक्ष लागले आहे.
एकच मुतारी तीही धोकादायक
गावातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी फक्त एकच मुतारी व तीदेखील विजेच्या रोहित्रालगत असल्याने जिवाच्या भीतीपोटी नागरिक त्याचा वापर करण्याचे प्रामुख्याने टाळतात.
पोस्ट ऑफिसच्या पायरींवरच मूत्रविसर्जन
ग्रामपंचायत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत असलेल्या पोस्ट ऑफिसच्या पायरींवरच लोक मूत्रविसर्जन करीत असल्याने ऑफिसमध्ये जाणाऱ्या नागरिकांना उग्र वासाला सामोरे जावे लागते.
सरपंचांनी फोन उचललाच नाही
सदर प्रकरणाच्या संदर्भात गावच्या सरपंच पूजा बोडके यांना प्रतिक्रियेसाठी फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
गड्या गाव झालं मोठं,पण मुतायच कुठं?
व्यापार,शेती,नोकरवर्ग यांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेल्या गावात स्वच्छतागृह नसल्याने गड्या गाव झालं मोठं, पण मुतायचं कुठं? हा प्रश्न सामान्य नागरिकांना सतावतो आहे.
0 Comments