सौजन्यशील निर्मळ मनाची श्रीमंती : प्रा. नानासाहेब लिगाडे

सांगोला, (कटुसत्य वृत्त): दगड, माती व भूमी हे निसर्गदत्त असतात, पण दगडाचे चिरे, मातीच्या विटा व वास्तूची पायाभरणी हे माणसाचे कर्तृत्व असते. व्यक्तिमत्त्वातील घटकद्रव्ये नैसर्गिक असतात; पण परिपूर्ण व्यक्तिमत्त्व आकाराला येते ते परिस्थितीच्या मुशीतूनच. असे परिस्थितीच्या पहाडातून, मुशीतून आकारास आलेले व्यक्तिमत्त्वाचे लेणे म्हणजे प्रा. नानासाहेब लिगाडे होत.
सांगोेले सूतगिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे यांचा आज 66 वा वाढदिवस. याच शुभदिनाचे औचित्य साधून एकूण तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज मोठ्या थाटामाटात सांगोला येथे संपन्न होत आहे. त्यातील ‘चंदन’ हा संपादीत ग्रंथ व दुसरे ‘काव्यचरित्र’ आहे. ही दोन्ही पुस्तके वडील जगन्नाथराव लिगाडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करवून देणारी आहेत. ‘चंदन’ या ग्रंथाची ही सुधारित आवृत्ती आहे, तर ‘काव्यचरित्र’ श्री. साबळे गुरूजी रचित आहे.
तिसरे पुस्तक ‘माझा जीवनप्रवास’ ही प्रा. नानासाहेब लिगाडे यांची आत्मकथा आहे. ही तिन्ही पुस्तके जीवनपट उलगडून दाखविणारी आहेत. या पुस्तकांना देखणे रूप आणले आहे ते नामवंत लेखक डॉ. कृष्णा इंगोले व शब्दशिवारचे प्रकाशक कवी इंद्रजित घुले यांनी.
माणूस एका भेटीत समजत नाही, त्याला अनेक भेटी व्हाव्या लागतात. या भेटीतून त्या व्यक्तीचे बहिरंग व अंतरंग समजते. माझे मित्र प्रा. लिगाडे व माझा तसा सहवास जवळ जवळ चाळीस वर्षांचा. दोघांचे शिक्षण व प्राध्यापक म्हणून सेवा रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखातच. त्यांचा शिक्षण प्रवास अकोला, माढा, पंढरपूर व कोल्हापूर असा, तर सेवेचा प्रवास कर्जत, दहीवडी, पनवेल व पंढरपूर असा. बत्तीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांनी पंढरपूर शाखेत असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली अन् सहकार क्षेत्रात जाऊन ते सांगोला सूतगिरणीचे चेअरमन झाले.
त्यांचे वडील भाई जगन्नाथराव लिगाडे यांच्या निधनानंतर त्यांनी काही वर्षांपूर्वी तात्यांवर ‘चंदन’ ही पहिली आवृत्ती, ‘माणदेशी जनसेवक’ हे त्यांचे चरित्र पुस्तक प्रकाशित केली व भाई गणपतराव देशमुख यांच्यावरील ‘झेपावणारा ग्रामीण महाराष्ट्र’ हे पुस्तकही प्रकाशित केले..
या सर्व पुस्तकांच्या अनुषंगाने म्हणजेच लेख संकलन, मुद्रिते तपासणी, भाई जगन्नाथराव लिगाडे स्मृतिदिनानिमित्त आयोजित वक्तृत्त्व स्पर्धांच्या अनुषंगाने तसेच भाई गणपतराव देशमुख वाढदिवस, कर्मवीर जयंती व इतर समारंभाच्या अनुषंगाने विविध प्रसंगांच्यावेळी प्रा. लिगाडेसर व माझा दाट परिचय झाला. त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू मला जवळून पाहण्यास मिळाले.
रयत शिक्षण संस्थेत सेवा करताना प्रा. लिगाडेसरांमधील एक शिस्तप्रिय, नैतिक वजन असलेला विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व संयतशीलपणे बोलणारा वक्ता व लेखक मी जवळून पाहिला. तसेच प्रा. लिगाडे रयत शिक्षण संस्थेत विविध पदावर काम करणारे म्हणजे लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, मॅनेंजिंग कौन्सिल सदस्य व जनरल बॉडी सदस्य यातील उत्तम प्रशासकही पाहिले.
प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी सहकार क्षेत्रात सांगोले सूतगिरणीचे संचालक व नंतर चेअरमन म्हणून भूमिका समर्थपणे पार पाडली आहे. या काळात कामगारांच्या हिताबरोबर सूतगिरणीचा लौकिक वाढवून फायदाही केला. हे करण्यासाठी शिस्तप्रियता व उत्तम नियोजनाचा वापरही करावा लागला. हे करताना त्यांच्या उशाला वडील आणि भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा, मार्गदर्शनाचा व कार्याचा धगधगता दीप होता.
सूतगिरणीच्या चेअरमनपदी कार्यरत असताना व रयत शिक्षण संस्थेच्या अनेक महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना त्या पदाला त्यांनी योग्य न्याय दिला व त्या पदाची उंचीही वाढवली.
त्यांना रयत शिक्षण संस्था व सांगोले सूतगिरणीमध्ये अनेक उच्च पदे मिळाली; ती त्यांच्या अंगी असलेल्या सत्यप्रियता, अखंड सावधानता, शिस्तप्रियता, शीलवत्ता, कष्टमयता, प्रामाणिकपणा व विश्वासार्हता या गुणांमळे व ते गुण आचरणात आणल्यामुळे.
प्रामाणिकपणा व विश्वासार्हता हे गुण असे आहेत की ते गुण त्या माणसाची शिफारस करतात. प्रा. लिगाडेसरांना आजपर्यंत जे काही मिळाले आहे, ते या गुणांचेच फलित आहे. या गुणांमुळे त्यांचा वर्तमानकाळ व भविष्यकाळ सुरक्षित झाला आहे.
वडील भाई जगन्नाथराव लिगाडे, भाई गणपतराव देशमुख, भाई प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर त्यांची नितांत निष्ठा, विश्वासार्हता होती व आहेही. त्यांचीही प्रा. लिगाडेसरांवर निष्ठा, विश्वासार्हता होती. म्हणून त्यांच्याबाबतीत सर्व काही जमून आले.
प्रा. लिगाडे सर मातृ, पितृ, भातृ, नेतृत्व व गुरू भक्त आहेत. तसेच ते पक्षनिष्ठ, संस्थानिष्ठ, समाजनिष्ठ, शिक्षकनिष्ठ, मित्रनिष्ठ, विद्यार्थीनिष्ठ, पत्नीनिष्ठ व ज्ञाननिष्ठ आहेत. ही जी निष्ठा आहे ती कृत्रिम थापलेली नाही, तर फुलातील रंगासारखी अंगभूत आहे.
या जगातील सर्वांत अवघड जागा कोणती? ती म्हणजे ‘हृदयात जागा मिळवणं’. त्यासाठी त्या नात्यात विश्वास, पारदर्शकता, पवित्रनिष्ठा व दुसर्याला स्पेस देण्याची भूमिका असावी लागते. तरच ते नाते अधिक दृढ, समृद्ध व बळकट होत जाते. असं प्रत्येक नातं जपण्याचं काम लिगाडेसरांनी केलं आहे. शिक्षण व सहकार क्षेत्रात त्यांनी नितांत निष्ठा ठेवून काम केले आहे, म्हणून त्यांना न मागता सर्वकाही मिळाले आहे.
माझे मित्र प्रा. नानासाहेब लिगाडे यांचे आयुष्याच्या सायंकाळी, पासष्टी ओलांडल्यानंतर ‘माझा जीवनप्रवास’ हे आत्मचरित्रपर पुस्तक आज प्रकाशित होत आहे. याचा मला अतीव आनंद होत आहे. विद्यार्थी दशेपासून शैक्षणिक क्षेत्रात व स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर सहकार क्षेत्रात कशी झेप घेतली हे त्यांनी साध्या, सोप्या भाषेत आणि शैेलीत तटस्थपणे कथन केले आहे. लेखकाच्या जीवनाचा हा स्वलिखित वृत्तान्त आहे. जे झाले-गेले, केले-जाणले, जे रूचले-खटकले याची इत्थंभूत माहिती मोठ्या आत्मीयतेने कथन केली आहे. जीवन प्रवासात वेगवेगळ्या वळणावर भेटलेले मित्र, गुरू, मार्गदर्शक, पदाधिकारी व मान्यवर यांचा आशीर्वाद, सल्ला कसा मिळाला आणि जीवनाला कशी विधायक कलाटणी मिळाली हे त्यांनी आत्मगौरव, आत्मस्तुती न करता प्रामाणिकपणे सत्यकथन केले आहे.
‘माझा जीवनप्रवास’ या आत्मचरित्रातून एका शेतकरी कुटुंबाचा, एका पिढीचा विकास कसा झाला हे समजते. तसेच स्थानिक राजकारण व सहकार यांच्या कार्यपद्धती व प्रक्रिया जवळून समजतात.
प्रा. लिगाडे आपल्या आत्मकथनात म्हणतात, “मी सांगोला सूतगिरणीचे 15 वर्षे जागृत पालकत्व केले. सूतगिरणीला लौकिक प्राप्त करून देऊन तिला फायदाही करवून दिला. तसेच आपल्या परिवाराचे जागृत पालकत्व केले, माझी पत्नी सौ. शकुंतलाने पालकत्वाची पूर्णवेळ नोकरी करून मला अजोड साथ दिली. म्हणून माझी तिन्ही मुले उच्चशिक्षित आहेत.”
चि. अमोल मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन एका कंपनीमार्फत अमेरिकेत कार्यरत आहे. मुलगी चि. अनिता बी. ई. कॉम्युटर इंजिनिअर आहे. सध्या ती एम. ई. करून पुणे येथील ‘एम.आय.एस. ग्लोबल’ या नामवंत सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे. चि. अजित बी. ई. इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग पदवी प्राप्त करून टाटाच्या एका कंपनीत तो डेप्युटी मॅनेंजर या पदावर कार्यरत आहे. सध्या तो कंपनीतर्फे कॅलिफोर्निया येथे जानेवारी 2022 ला एम. एस.च्या शिक्षणासाठी रवाना झाला आहे. पुढे प्रा. लिगाडेसर म्हणतात, “तिन्ही मुले शिक्षणात प्रगती करणारी, निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न निघाली, हे सांसारिक आयुष्याच्या दृष्टीने आम्हा उभयतांना अभिमानास्पद आहे.”
आईची कॅन्सरग्रस्त आजारापासून सुटका कशी केली, वडील भाई जगन्नाथराव लिगाडे उर्फ तात्या व गुरुवर्य प्राचार्य डी. डी. थोरात यांची मुंबईसारख्या ठिकाणी बायपास सर्जरी जातीने लक्ष घालून, अखंड सावधानता बाळगून कशी केली, ते मोठ्या भिजलेल्या अंत:करणाने त्यांनी कथन केले आहे.
वडील आजारी असताना त्यांची पुणे हॉस्पिटलमधील अवस्था व त्यांचे निधन झाल्यानंतर स्वत:ची, इतरांची शोकपूर्ण झालेली अवस्था, तो दु:खमय प्रसंग वाचकांची मनं हेलावून टाकणारा आहे. पंधरा वर्षात सूतगिरणीची प्रगती कशी झाली, तसेच गेल्या पन्नास वर्षांत संपूर्ण परिवाराची प्रगती कशी झाली ते त्यांनी सत्याचा आपलाप न करता अगदी प्रामाणिकपणे, तटस्थपणे कथन केले आहे.
‘माझा जीवनप्रवास’ या आत्मकथनात 104 पृष्ठे आहेत. याला आटोपशीर अशी प्रस्तावना प्रा. लिगाडेसरांचे गुरू डॉ. अशोक चौसाळकर यांची आहे. त्यानंतर प्रा. लिगाडे सरांचे सर्वांचा उहापोह करणारे आदरयुक्त मनोगत आहे. तसेच सर्वांना समजणारे सुबोध शब्दांकन नामवंत लेखक डॉ. कृष्णा इंगोले यांचे आहे. या पुस्तकाच्या अंतरंगात एकूण 9 प्रकरणे आली आहेत. ती अशी ‘शिवारातील पाऊलखुणा’, ‘पाटी पुस्तकांच्यासोबत’, ‘जडणघडण’, ‘घरातून चालते व्हा’, ‘वटवृक्षाच्या छायेत’, ‘कर्तृत्वाची भरारी’, ‘चंदनाचा वारसा’, ‘विश्वस्त’, ‘शिखर संचित’.
या लेखनात कुठेही भपका नाही, डामडौल नाही, दर्शन आहे; प्रदर्शन नाही. घटना आहेत, पण त्यावर भाष्य नाही. आत्मस्तुती, आत्मगौरव नाही, सत्याचा आपलाप नाही, स्वत:च्या स्वभावातील दोष सांगत स्वयंशिस्त बाळगत लहानमोठ्यांचा आदर, सन्मान करीत जीवनात शिखर कसे गाठले, ते प्रामाणिकपणे, तटस्थपणे, प्रांजळपणे कथन केले आहे. स्वत:मधील रागाचे, अहंकाराचे रूपांतर मित्र, गुरू व मान्यवर यांच्यामुळे लीनतेत, नम्रतेत कसे झाले, याचा त्यांनी कबुली जवाब मोठ्या विनयशीलतेने कथन केलेला आहे.
‘माझा जीवनप्रवास’मध्ये आजी कासाई, सुभद्राआई, वडील जगन्नाथ लिगाडे तात्या, भाई गणपतराव देशमुख, भाई एन. डी. पाटील, गुरुवर्य आदलिंगे गुरूजी, प्राचार्य डी. डी. थोरात, प्राचार्य के. एस. मोहिते, प्राचार्य आर. पी. वलेकर व सहचारिणी सौ. शकुंतला यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे प्रामाणिकपणे प्रा. लिगाडेसरांनी सांगितले आहे.
सकस ‘बी’ माळावर पडून उपयोगाचे नाही. ते वापसा आलेल्या ठिकाणीच पडावे लागते, तरच त्याची जोमाने वाढ होते. लिगाडेसरांना आजी, आई, वडील, बंधू, मित्र, गुरू, भाई गणपतराव देशमुख, भाई एन. डी. पाटील यांचा परिसस्पर्श, आशीर्वाद लाभला म्हणून नकातेवाडीत जन्माला आलेल्या रोपट्याचे डौलदार झाडात रूपांतर झाले. ‘बी’ जर किडकं निघालं असतं, तर त्याचं रूपांतर झाडात झालंच नसतं. लिगाडेसरांच्या बाबतीत या दोन्हीही गोष्टी एकमेकांना पूरक ठरल्या आहेत. नळाच्या पाण्याने पाय धुता येतात; पण हृदय धुण्यासाठी अश्रुंची, सांत्वनाची गरज असते.
“वादळात दिव्याभोवती पसरणारे हात
संकटकाळात खांद्यावर हात ठेवणारी अलगद साथ ”
असा भावनात्मक ओलावा जपणं फार थोड्यांना जमतं, अशा थोड्या माणसांमधील प्रा. नानासाहेब लिगाडे आहेत. अशी ही सरांची ‘सौजन्यशीलता व निर्मळ मनाची श्रीमंती’ मी माझ्या आईच्या आणि वडिलांच्या निधनाच्यावेळी जवळून अनुभवली आहे. माणसाची खरी ओळख त्याच्या अंत:करणातील ओलाव्याने, मनुष्यत्वाने होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांकडे माणसं ओळखणं व ती टिकवणं हा लक्षात राहावा असा गुण आहे.
मदत तेरेसा यांचं एक वचन आहे, ‘तुमच्यातील क्षमता तुम्हाला शिखरावर नेईल; पण तिथे टिकून राहण्यासाठी गरज असते ती चारित्र्याची.’ लिगाडेसरांकडे चारित्र्य हाही गुण आहे, म्हणून त्यांना न मागता सारे काही मिळाले आहे. जो यशापेक्षा प्रयत्नांवर नजर ठेवतो, तो यशस्वी होतो. लिगाडेसरांनी प्रयत्नावर नजर ठेवली. ज्ञानाला प्रयत्नाची, शीलाची जोड दिली म्हणून त्यांचा जीवन प्रवास शेवटी अमृताहुनी गोड झाला आहे. थोर विचारवंत थॉमसन म्हणतात, ‘आरोग्य हे सुखाचे मूलतत्त्व आहे आणि व्यायाम हे आरोग्याचे मूलतत्त्व आहे.’ ही दोन्ही तत्त्वे लिगाडेसरांच्यामध्ये एकरूप झाली आहेत. थोडक्यात, लिगाडेसरांनी निष्ठा ठेवून कष्टातून झेप घेतली आहे व स्वत:ला ‘सिद्ध’ केले आहे. स्वत:बरोबर इतरांनाही झेप घेण्याची ताकद दिली आहे. त्यांचा ‘माझा जीवनप्रवास’ हा आत्मचरित्रपर ग्रंथ भावी पिढीला उपयुक्त, मार्गदर्शक ठरेल अशी आशा बाळगून लेखकाच्या पुढील लेखन प्रवासाला, त्यांच्या घरकुलाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक रेशीम शुभेच्छा देतो. त्याचबरोबर विधात्याकडून त्यांच्या प्रदीर्घ निरोगी आयुष्याची अपेक्षा करतो व येथेच थांबतो.
0 Comments