श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा - राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांची राज्यमंत्री तटकरे यांच्याकडे मागणी
पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये महाराष्ट्रातील सर्व समित्या, मंदिर समित्या नव्याने पुर्नगठीत करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपच्या काळात स्थापन झालेली व सध्या अस्तित्वात असलेल्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत असून या दरम्यानच्या कालावधीत विद्यमान सदस्य मंडळ मंदिर समितीच्या कोट्यावधी रूपये खर्चाचे निर्णय घेत आहे. शिर्डी येथील साई संस्थानवर तात्काळ पुर्नगठन करून नवीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतू पंढरपूर येथील मंदिर समितीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सदरची समिती तात्काळ बरखास्त करून नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी उद्योग, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, लवकर समिती स्थापन केल्यास आषाढी यात्रा 2022 मध्ये या नवीन विश्वस्तांना चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळेल. समिती उशिरा स्थापन झाल्यास नवीन विश्वस्तांना आषाढी यात्रा कालावधीत काम करण्यास अडचणीचे ठरेल. तरी श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करून नवीन समिती लवकरात लवकर स्थापन करावी.
विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार स्थापन होवून सुमारे अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. या समितीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना एक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे भाजपचे राज्यात सरकार नसताना ही त्यांनी नेमलेली समिती कार्यरत असल्यामुळे ती मंदिर समिती तात्काळ बरखास्त करावी व नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
0 Comments