Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांशी 31 मे रोजी व्हर्चुअल संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांशी 31 मे रोजी व्हर्चुअल संवाद

            पुणे, (कटुसत्य वृत्त): 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 31 मे 2022 रोजी हे शिमला, हिमाचल प्रदेश येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात राज्य व जिल्हास्तरावर पंचायत राज संस्था (पीआरआय), स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांसह निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली आहे.

            सरकारांकडून लाभार्थीवर लक्ष केंद्रित करून कोणताही नागरिक मागे राहू नये व त्याच्या विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार या परिसंवादात केंद्र पुरस्कृत योजनांच्या देशभरातील निवडक लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण व शहरी), जल जीवन मिशन व 'अमृत' अभियान, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश राहणार आहेत.

            या ऑनलाईन परिसंवादासाठी जिल्हास्तरावर 500 व्यक्तींना सहभागी करून घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिल्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने कळवले आहे. यामध्ये केंद्र आणि राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, स्वातंत्र्यसैनिक, जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, प्रशासकीय अधिकारी, बँकर्स, नागरी संस्था संघटना आदींना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच योजनांचे लाभार्थी यांनाही परिसंवादमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

            पंतप्रधान यांचा परीसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित केला जाणार असून संवादाचा पहिला भाग सकाळी 10.15 ते 10.50  या कालावधीत होणार आहे. या प्रसंगी पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्तादेखील लाभार्थ्यांना हस्तांतरित केला जाईल.

            संवादाच्या दुसऱ्या भागात राज्य व जिल्हास्तरावरून आभासी पद्धतीने (व्हर्च्युअल) पंतप्रधान यांच्या शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडले जाणार आहेत. जिथे पंतप्रधान निवड केलेल्या योजनांच्या जिल्ह्यांसोबत निवडक लाभार्थ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे आभासी संवाद साधतील. या कार्यक्रमाचे दूरदर्शन आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तसेच ट्विटर, फेसबुक, युट्युब आदी विविध समाजमाध्यमाद्वारे थेट (लाईव्ह) प्रसारित करण्यात येणार आहे, असेही श्रीमती कडू यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments