मराठा क्रांती मोर्चाचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन !
मुंबई, (नासिकेत पानसरे) : मुख्यमंत्र्यांना आंदोलनकर्त्या आजीला भेटायला वेळ आहे पण सरकार म्हणून दिलेले आश्वासन त्यांनी पाळलेले नाही, असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी बुधवारी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत आम्हाला भेटण्यासाठी मुख्यमंत्री येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा पवित्रा यांनी घेतला. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगण्यात आले.
मराठा समाजाच्या एकूण १४ मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानात उपोषण पुकारले होते. या मागण्या मान्य करण्यात
येणार असल्याचे लेखी आश्वासन देत सरकारने त्यांना उपोषण सोडण्यास भाग पाडले, त्यानंतर सुमारे दीड महिन्यानंतरही अद्याप या मागण्या मान्य होऊनही त्याची दिलेल्या वेळेत पूर्तता झालेली नाही.
यामध्ये सारथीमधील रिक्त पदे, सारथीची आठ उपकेंद्रांसाठी जमीन देणार, मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना एसटीत नोकरी तसेच प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांनासाठी वसतीगृहांचं गुढी पाडव्याला उद्घाटन होणार होते पण अद्याप या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. या मागण्यांचा आढावा घेण्यासाठी मराठा मोर्चाचे समन्वय विद्यार्थी मंत्रालयात आले होते. पण संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं हे आंदोलक अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलनाला बसले.
दरम्यान, आंदोलनकर्ते अंकुश कदम म्हणाले, सरकारचे काही जातीयवादी अधिकारी मराठा समाजाचा घात करण्याच काम जाणीवपूर्वक करत आहेत. आज गरज नसताना या अधिकाऱ्यांनी तोंडी मत मागवले असून हे अधिकारी आमच्या मागण्या धुडकावत आहेत. जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर ते आत्महत्या करण्यास हे अधिकारी भाग पाडत आहेत. झुकेंगा नही म्हणणाऱ्या म्हातारीला भेटायसाठी मुख्यंमत्र्यांना वेळ असतो पण आमचे विद्यार्थी मेल्यानंतर मुख्यमंत्री येणार आहेत का? जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला भेटायला येत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. अशी भूमिका घेत त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या दालनात ठिय्या धरला होता.
0 Comments