बेरोजगार युवकांनी स्वावलंबी होण्याची गरज- पोलिस आयुक्त हरीश बैजल

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सारथी युथ फौंडेशनच्यावतीने बेरोजगार युवकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते तसेच कामगार वर्गातील युवकांना मोफत शिलाई प्रशिक्षण सारथी कौशल्य विकास केंद्रा अंतर्गत दिले जाते. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण करणार्या युवकांना वाहन चालविणे परवाना वितरण व सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र अंतर्गत महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशवी उत्पादनाचे उद्घाटन सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना हरीश बैजल म्हणाले, ‘हातामध्ये बळ आहे पण त्या हाताला काम नाही मिळालं तर हे हात व्यसनाकडे अथवा गुन्हेगारीकडे वळतात. सध्याच्या काळात युवकांनी रोजगार उपलब्ध होऊ शकणार्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षणे घेऊन स्वत:मधील कौशल्यांचा विकास करावा. यासाठी सारथी सारख्या संस्थांची मदत आपण घेऊ शकता. शिकलेल्या गोष्टी स्वत: पुरत्या मर्यादित न ठेवता त्याचा इतरांसाठीही उपयोग करावा.’
सुरवातीला सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन कामगार वसाहतीत चालणार्या प्रशिक्षण कार्याचे हरीश बैजल यांनी कौतुक केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीनी तयार केलेल्या उत्पादनाची पाहणी केली. याच प्रशिक्षण केंद्रामध्ये तयार करण्यात आलेल्या कापडी बटवा पिशवी उत्पादनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यापुढे सदर कापडी बटवा पिशवी सामाजिक शुल्काच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करन्यात आली आहे. वात्सल्य ट्रस्ट मुंबई आणि सारथी युथ फौंडेशनच्या अंतर्गत मारुती सुझुकी ड्रायव्हिग स्कूलमध्ये चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीणा वाहन चालविणे परवाना आणि प्रमाणपत्राचे वितरण पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास चव्हाण उद्योग समूहाचे संचालक शिवप्रकाश चव्हाण आणि घनश्याम चव्हाण साकव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, सारथी युथ फौंडेशनचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर घोडके, तीर्थक्षेत्र पर्यटन सुविधा केंद्राचे संचालक स्वप्नील काळे, रिटायर्ड मेजर इरन्ना धनशेट्टी, मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूलचे सहाय्यक व्यवस्थापक शिवशंकर ढंगे व त्यांची प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चनबसप्पा कांबळे, विठ्ठल चाबूकस्वार, तुकाराम चाबूकस्वार, हनुमंत सलगर, योगेश सोनवणे, रत्नशील खंडागळे, अश्विनी दलभंजन, भाग्यश्री चाबूकस्वार, रेणुका सुरवसे, पौर्णिमा यादव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल बिराजदार व आभारप्रदर्शन अॅड. जावेद नगारे यांनी केले.
0 Comments