नागरिकांनी आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावानिवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांचे आवाहन
%20(3).jpeg)
%20(3).jpeg)
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-जिल्हाभरात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली 18 एप्रिल ते 22 एप्रिल 2022 दरम्यान आरोग्य मेळावे घेण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले. नियोजन भवन येथे आरोग्य मेळाव्याच्या आयोजनाबाबत आढावा बैठकीत श्रीमती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित होते.श्रीमती पवार यांनी सांगितले की, आरोग्य मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करावे. गरजू आणि गरीब रूग्णांना या मेळाव्यातून आरोग्य सुविधा देण्यात याव्या. प्रत्येक मेळाव्याच्या ठिकाणी रूग्णांना योग्य सोयी-सुविधा द्याव्यात. प्रत्येक आजारावरील वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध करून घ्यावेत. प्रत्येक शिबीरासाठी तज्ज्ञ उपलब्ध राहतील, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बालकांना बालरोग तज्ज्ञांची सेवा
जिल्ह्यातील आजारी, हृदयविकार असणाऱ्या बालकांवर बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. याबरोबरच कान,नाक-घसा तज्ज्ञ, प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ, दंत चिकित्सक असणार आहेत. मेळाव्यात प्रत्येक ठिकाणी रूग्ण तपासणीसोबत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
येथे घ्या आरोग्य सेवेचा लाभ
18 एप्रिल रोजी पंढरपूर उपजिल्हा रूग्णालय आणि ग्रामीण रूग्णालय, वडाळा येथे आरोग्य मेळावा होणार आहेत. 19 एप्रिल रोजी ग्रामीण रूग्णालय, मंगळवेढा आणि ग्रामीण रूग्णालय, सांगोला, 20 एप्रिल रोजी उपजिल्हा रूग्णालय, अकलूज आणि ग्रामीण रूग्णालय, मंद्रुप, 21 एप्रिल रोजी ग्रामीण रूग्णालय, अक्कलकोट, ग्रामीण रूग्णालय, कुर्डूवाडी, ग्रामीण रूग्णालय, बार्शी आणि 22 एप्रिल 2022 रोजी उपजिल्हा रूग्णालय, करमाळा आणि ग्रामीण रूग्णालय, मोहोळ येथे आरोग्य मेळावे होणार आहेत. याठिकाणी रूग्णावर उपचार करण्यात येणार आहेत.
काय असणार मेळाव्यात
मेळाव्यात रूग्णांच्या मोफत रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत. आरोग्य तपासणीसोबत युनिक हेल्थ आयडी तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे. पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करणे. नागरिकांना निरोगी राहण्यासाठी प्रेरित करणे, लवकर आजाराच्या निदानासाठी स्क्रिनींग, औषधांसह मुलभूत आरोग्य सेवा आणि आवश्यकतेनुसार आरोग्य तज्ज्ञांच्या संदर्भ सेवा देण्यात येणार आहेत.
0 Comments