पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात 18 एप्रिलला

मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन
पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन सोमवार दि.18 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.00 ते 2.00 यावेळेत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी दिली आहे. या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांना आरोग्य सुविधा मोफत दिल्या जाणार असून, यामध्ये हृदय रोग, मधुमेह, रक्तदाब, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री तपासणी, लहान मुलांचे आजार, मोतीबिंदू, कान, नाक, घसा आजार, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग इत्यादी आजारांवर विशेषज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच रक्त, लघवी, एक्स-रे व ईसीजी यांच्या तपासण्या देखील मोफत केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत दिले जाणार असल्याचे डॉ.गिराम यांनी सांगितले.तसेच आयुर्वेद विभागाअंतर्गत मोफत तपासणी तसेच निरोगी जीवनशैली विषयी आहार, योगा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे किशोर वयातील मुलामुलींना, कुमार अवस्थेतील बालकांच्या समस्या याविषयी सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्यात नेत्रदान, अवयवदान, देहदान संबधी सर्व इच्छापत्र भरुन घेतली जाणार आहेत.यामेळाव्यासाठी पंढरपूर येथील आय.एम.ए, निमा, आय.डी.ए, होमिओपॅथी असोसिएशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब, रॉबिनहूड आर्मी यांचे सहकार्य लाभणार आहे. पंढरपूर तालुक्यातील तसेच परिसरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य मेळावाचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ.गिराम यांनी केले आहे.
0 Comments