पारा वाढला, महावितरणला घाम फुटला; जनता उकाड्यामुळं हैराण, वीजेच्या मागणीत विक्रमी वाढ
मुंबई (कटुसत्य वृत्त ):- एकीकडे राज्यावर उष्णतेच्या लाटेचं संकट असताना दुसरीकडे वीजेच्या मागणीतही रेकॉर्डब्रेक वाढ झालीय. दोन दिवसांपूर्वी १५ मार्च या एका दिवसात राज्यभरात २७ हजार २१२ मेगावॅट वीज वापरली गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईनंही वीज वापराचा उच्चांक गाठलाय. मुंबईत एका दिवसात ३६०० मेगावॅट वीज वापरली गेली आहे. यंदाचा उन्हाळा तीव्र असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात वीजेचा वापर सरासरी २४ हजार मेगवॅटपर्यंत पोहोचण्याचा महावितरणचा अंदाज आहे. आधीच कोळशाचा तुटवडा आणि त्यात आर्थिक अडचणीत सापडलेल्या महावितरणला ही मागणी पूर्ण करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. उपलब्ध वीज राज्याला पुरावी यासाठी नागरिकांनी कमी वीज लागणारे दिवे, इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरावी असं आवाहन महावितरणनं केलंय. राज्यात वीज मागणी वाढली असतानाही महावितरणने मागणी एवढा वीज पुरवठा केला असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. मागणीप्रमाणे तब्बल २३ हजार ६०५ मेगावॅट वीजेचा सुरळीत व अखंडित वीजपुरवठा केला असल्याचे महावितरणने म्हटले. गेल्या महिन्याभरात वीजेच्या उच्चांकी मागणीचा विक्रम घडला आहे. याआधी १९ फेब्रुवारी रोजी महावितरणकडून २३ हजार २८६ मेगावॅटची मागणी पूर्ण केली. त्याआधी ८ फेब्रुवारी रोजी २३ हजार ७५ मेगावॅट, १२ फेब्रुवारी रोजी २३ हजार १६३ मेगावॅट इतक्या मागणीप्रमाणे वीज पुरवठा करण्यात आला होता. भारनियमन टाळण्यासाठी प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे वीजेची मागणी देखील सातत्याने वाढत आहे. सद्यस्थितीत महावितरणच्या कार्यक्षेत्रामध्ये वीजेची मागणी २३ हजार ते २३ हजार ५०० मेगावॅट दरम्यान स्थिरावली आहे. मात्र तापमानात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये वीज मागणी ही २४ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत वीजेची विक्रमी मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात वीजेचे भारनियमन करण्यात आलेले नाही व तशी गरज भासणार नाही याबाबत काळजी घेतली जात आहे. त्यासाठी सध्या महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तींच्या कामांना वेग देण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.वाढत्या मागणीवर वीजेचे व्यवस्थापन महावितरणने दीर्घकालीन वीजखरेदी करार असलेल्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून मंगळवारी १५ मार्च रोजी महानिर्मितीकडून ६ हजार ५७८ मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून एकूण ४ हजार ९११ मेगावॅट तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्पो या खासगी प्रकल्पांमधून ४ हजार ७२२ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. सोबतच नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतांमधून सौर ऊर्जा- २५८५ मेगावॅट, पवन ऊर्जा- ६०३ मेगावॅट तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पांतून १५०० मेगावॅट असे एकूण ४ हजार ६८८ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. उर्वरित वीजेची मागणी ही कोयना व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १ हजार ६१२ मेगावॅट वीजनिर्मिती करून तसेच मुक्त ग्राहक व रेल्वेच्या वीजनिर्मिती स्रोत्रातून ७२२ मेगावॅट आणि पॉवर एक्स्चेंजमधून ३७२ मेगावॅट वीजेची खरेदी करण्यात आली.
0 Comments