सोलापूर विभागात ६७ चालकांची भरती

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. पाच महिन्यानंतरही अद्यापही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, कामावर परतले नाहीत. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने धावत नसून, राज्यात कंत्राटी चालकांची भरती सुरू आहे. याचाच भाग म्हणून सोलापूर विभागातही ६७ कंत्राटी चालकांची नियुक्ती केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिल्यानंतर संपातील कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.असे असताना राज्यात पंचवीस ते तीस टक्के कर्मचारी कामावर न आल्यास एसटीची सेवा अद्यापही थांबली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे संपावर तोडगा काढण्यासाठी आणि एसटीच्या फेऱ्या सुरू होण्यासाठी कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर विभागात एकूण ८० चालकांची भरती केली जाणार असून, यातील सध्या ६७ चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातून २६० बस धावत असून दररोज ४० लाखांचे उत्पन्न मिळत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार असून, त्यानंतर महामंडळाच्या सूचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गेल्या आठवड्यात निलंबित, बडतर्फ, संपावर असलेले कर्मचारी कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने महामंडळ प्रशासनाने बाहेरगावी जाणाऱ्या बसची संख्या वाढविली आहे. सद्यस्थितीला दररोज ८४ हजार किलोमीटरचा प्रवास होत आहे. त्याच बरोबर खासगी वाहकांची देखील भरती करण्यात येणार असून, त्यांची संख्या देखील वाढणार असल्याचे सांगण्यात आले.महामंडळाकडून कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, ६७ चालकांची निवड करण्यात आली आहे. यातून एसटीच्या फेऱ्या आणि उत्पन्न वाढणार आहे.
0 Comments