मोजणी ऑफिसमध्ये अॅड.श्रीरंग लाळे यांचे 'जाब विचारा' आंदोलन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीच्या मोजणीसाठी गोरगरीब शेतकऱ्यांना हेलपाटे लावण्याची पद्धत भूमी अभिलेख(मोजणी) कार्यालयात रूढ होत चालली आहे. योग्य ते शुल्क भरून शेतकरी मोजणीसाठी वारंवार हेलपाटे मारत असताना भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी मात्र वेगवेगळी कारणे देत कामचुकारपणा दाखवत मोजणी करण्यास व प्रकरणे निकाली काढण्यात मुद्दाम विलंब करत आहेत. याबद्दल मोहोळ येथील अॅड.श्रीरंग लाळे यांनी कर्मचारी व अधिकारी यांना थेट जाब विचारला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही आजकाल मोजणीसाठी शेतकऱ्यांकडून चलन सोडून सर्रास इतर लाचेची मागणी केली जाते. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात भ्रष्टाचार माजला आहे. नक्कल ,नकाशा, मिळकत पत्रिका,फेरफार व इतर सर्वच कागदपत्रे देण्यासाठी सर्रास पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास वेगवेगळी कारणे दाखवत कामासाठी टाळाटाळ केली जाते. वयस्कर शेतकरी, मिलिटरी जवान यांनासुद्धा जाणीवपूर्वक हेलपाटे मारण्यास हे कार्यालय भाग पाडत आहे. अनेक शेतकऱ्यांची भांडणे , मारामाऱ्या होण्यास सुद्धा भूमी अभिलेख कार्यालयाचा अकार्यक्षमता व भ्रष्टाचार जबाबदार आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांसाठी काटेकोर नियोजन व कार्यक्षम कर्मचारी यांची गरज असल्याचे अॅड.श्रीरंग लाळे यांनी सांगितले.त्याच वेळी 'जनता मालक आहे,जनतेने जाब विचारला पाहिजे !' असेही ते म्हणाले.एक आठवड्याच्या आत भूमी अभिलेख कार्यालयात सकारात्मक बदल न दिसल्यास वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा अॅड.श्रीरंग लाळे यांनी भूमी अभिलेख मोहोळ कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना दिला आहे.

0 Comments