सोलापूरचा 39 वा महापौर कोण? आरक्षण ठरवणार समीकरणे
महापौरपदासाठी कोठे गट आघाडीवर?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत तब्बल 87 जागा पटकावल्या असून महापालिकेवर कमळाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. 102 सदस्यीय सभागृहात स्पष्ट बहुमत मिळाल्याने यंदा महापौरपद भाजपकडेच जाणे निश्चित मानले जात आहे. मात्र महापौरपदाच्या आरक्षणाची अधिकृत घोषणा होईपर्यंत अंतिम नावावर शिक्कामोर्तब होणार नसल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण 38 महापौर झाले असून सात महिलांनीही या पदाची धुरा सांभाळली आहे. खुल्या जागेवरही महिलांना संधी देण्याची परंपरा सोलापूरने जपली असली तरी यंदा महापौरपद ‘खुला पुरुष’ आरक्षणासाठी जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. असे झाल्यास भाजपमध्ये इच्छुकांची मोठी रांग लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार देवेंद्र कोठे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महापालिकेतील संघटनशक्ती, स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि नगरसेवकांवरील पकड यामुळे कोठे गट ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खुला पुरुष आरक्षण जाहीर झाल्यास कोठे गटातील दोन नावे विशेष चर्चेत आहेत —
विनायक कोंड्याल (प्रभाग 12) : आमदार कोठे यांचे भाऊजी. त्यांनी शिवसेनेच्या पोतन यांचा तब्बल 14 हजार मतांनी पराभव करत हॅट्ट्रिक साधली आहे. विक्रमी मताधिक्यामुळे त्यांची दावेदारी भक्कम मानली जात आहे.
प्रथमेश कोठे : स्वर्गीय महेश कोठे यांच्या निधनानंतरची जागा कायम राखत त्यांनी कमळ पुन्हा फुलवले आहे. संघटनशक्ती आणि भावनिक लाट यांचा लाभ घेत त्यांनी प्रभावी विजय मिळवला.
कोठे समर्थकांना महापौरपद देण्याचा निर्णय झाल्यास या दोघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय प्रक्रियेत आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांचाही प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षांतर्गत समतोल, अनुभव, सामाजिक प्रतिनिधित्व आणि गटबाजी टाळण्याचा विचार करूनच भाजप नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे समजते.
भाजपचे संख्याबळ मजबूत असले तरी महापौरपदाच्या आरक्षणानुसार समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे सोलापूरचा 39 वा महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरक्षणाची घोषणा होताच महापौरपदाची शर्यत निर्णायक टप्प्यात जाणार असून शहरातील राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
.jpg)
0 Comments