उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर यांच्या वाढदिवसानिमित्त 101 रोपे वृक्ष बँकेस भेट

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोले नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व सामाजिक भान जपत सांगोले नगरपरिषदेमार्फत स्थापन करण्यात आलेल्या सांगोला वृक्ष बँकेस माजी नगरसेवक व गटनेते आनंदा माने यांनी विविध प्रकारच्या 101 वृक्षांची रोपे भेट दिल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावर अवलंबून आहे आणि झाडे ही या निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतू चक्र झाडांमुळेच संतुलित राहते आणि मानवी जीवनही झाडांमुळेच शक्य आहे.परंतु मानवाने मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी याच झाडांना हानी पोहचवण्यास सुरुवात केली आहे. जंगलतोड करून तो इमारती उभ्या करू लागला आहे आणि त्यामुळे निसर्गाला हानी पोहचत आहे आणि मानवाच्याच जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय एकच आहे तो म्हणजे, आपण झाडांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून कृतज्ञतेने जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे व पर्यावरणाचा हा बिघडलेला समतोल सुधारण्यासाठी संघटित प्रयत्न केले पाहिजेत.सांगोले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून 7 जानेवारी 2021 रोजी सांगोले नगरपरिषदेने वसुंधरेच्या संवर्धनासाठी सांगोला वृक्ष बँक स्थापन केली आहे.या वृक्ष बँकेस शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे , नागरिक वाढदिवस, तसेच इतर कार्यक्रमानिमित्त झाडांची रोपे देऊन सांगोले नगरपरिषदेच्या वृक्षलागवडीस प्रोत्साहित करत असतात. सांगोले नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व गटनेते आनंदा माने यांनी सामाजिक भान जपत नगरपरिषदेच्या वृक्षारोपण कार्यक्रमांना प्रोत्साहित करत विविध प्रकारची 101 रोपे वृक्ष बँकेस भेट दिली. यावेळी सांगोले नगरपरिषदेचे सहायक मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्निल हाके, आस्थापना लिपिक इम्रान शेख, आरिफ मुलाणी, इतर पाणीपुरवठा कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.निसर्गाचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प केला पाहिजे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ‘एक तरी झाड जगवा!’ या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तरच ही वसुधा पुन्हा ‘हरीत’ बनेल.कैलास केंद्रे मुख्याधिकारी सांगोले नगरपरिषद.
0 Comments